नाशिक विभागीय सेना-भाजप मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचा इशारा

शिवसेना-भाजप युती झाली असली तरी विरोधकांना कमी लेखू नका. डावपेच करणारी मातब्बर मंडळी त्यांच्यात आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत युतीच्या कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, असा सूचक इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवसेना-भाजप युतीचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा नाशिक विभागीय मेळावा रविवारी येथे झाला. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी गोटातील कमकुवत बाबींवर बोट ठेवले. त्यांच्याकडे उमेदवार नाहीत. न खेळणारा त्यांचा कप्तान असल्याचा टोला लगावला.

जवळपास साडेचार वर्षांनंतर मेळाव्यानिमित्त एकत्र आलेल्या विभागातील सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उद्धव यांनी देव, देश आणि धर्मासाठी ही युती झाल्याचे सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजप नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी युतीचे हे रोपटे लावले. त्याचे वटवृक्षात रूपांतर होत असताना आपण आज वाद घालत बसलो तर कपाळकरंटे ठरलो असतो. युती झाली नसती तर देश कोणाच्या हाती गेला असता? ते आपल्याला परवडणारे नव्हते. ही युती देशाच्या रक्षणासाठी आणि सामान्यांना बलवान करण्यासाठी झाली आहे. युती झाल्यामुळे विरोधकांची बोलतीच बंद झाली. त्यांच्या तोफा थंडावल्याचे उद्धव यांनी नमूद केले. सुजय विखेंच्या संदर्भाने शरद पवार यांच्या विधानाचा नामोल्लेख न करता त्यांनी समाचार घेतला. पवार यांची पूर्ण हयात स्वत:च्या कुटुंबाचे लाड पुरवण्यात गेली. दुसऱ्याच्या घरातही चांगली, योग्यतेची माणसे जन्माला येतात हे त्यांना माहीत नसते. शिवसेनेच्या मागण्या मान्य करत मुख्यमंत्र्यांनी त्या अमलात आणल्या. उभय पक्षातील वाद संपुष्टात आले असून युतीला नवीन भगवी पालवी फुटली आहे. गद्दारी, कटकारस्थान चालणार नाही. शेतकरी कर्जमाफीचा लाभ आणि पीक विम्याची रक्कम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य सरकारने गावोगावी केंद्र स्थापन करावीत, ही सेनेची मागणी कायम असल्याचे उद्धव यांनी सांगितले.

उपस्थितांकडून वंदे मातरम ते युतीचा विजय असो अशा घोषणा वदवून घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणाला सुरुवात केली.विरोधकांची तत्त्वशून्य आघाडी कधीही टिकूशकणार नाही. राज्यात विरोधकांकडे उमेदवारही नाहीत. सेना-भाजपची युती राष्ट्र, हिंदुत्वासाठी आहे. ही अभेद्य युती असून ती केवळ लोकसभेपुरती मर्यादित नाही. पंतप्रधान यांनी पाकिस्तानला धडा शिकवून देश सुरक्षित हातांमध्ये असल्याचे सिद्ध  केले. भारतीय सैन्याने थेट पाकिस्तानात कारवाई करत शौर्य दाखवले. विरोधकांनी सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विरोधी पक्षातील नेते दहशतवाद्यांचा आदरपूर्वक उल्लेख करतात. विरोधकांचा चेहरा उघडा पाडावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.  मोदी सरकारने पाच वर्षांत खऱ्या अर्थाने गोरगरिबांच्या कल्याणासाठी राबविलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली.

गरज म्हणून युती -खडसे

मेळाव्यात भाजपचे नेते एकनाथ खडसे यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. ते व्यासपीठावर जाण्यास तयार नव्हते. सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आग्रहाने त्यांना व्यासपीठावर नेले, परंतु त्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. कार्यक्रमाआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाच वर्षांपासून सेना-भाजप सरकार एकत्र आहे. स्थानिक पातळीवर एकमेकांविरोधात लढताना निर्माण झालेली कटुता युती झाल्यामुळे दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील विधानसभा निवडणुकीवेळी युती तुटली. तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आज दोन्ही पक्षांना एकत्र येण्याची गरज होती म्हणून ते एकत्र आल्याचे खडसे यांनी सांगितले.