21 October 2020

News Flash

मणिशंकर अय्यर छाप पुढाऱ्यांना घेऊन चालवण्यापेक्षा काँग्रेस पक्ष बरखास्त केलेला बरा – उद्धव ठाकरे

'हा दोष राहुल गांधींचा नाही, तर थकलेल्या दिशाहीन काँग्रेसचा आहे'

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला, पण पक्षाने तो स्वीकारला नाही. तो न स्वीकारणाऱयांना चेहरे नाहीत व मजबूत हात नाहीत हेच काँग्रेसचे खरे स्वरूप आहे. अशा पक्षाचे काय होणार, हा प्रश्नच आहे! असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून म्हटलं आहे.

राहुल गांधी यांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात भरकटला. मोदी यांनी हिंदू राष्ट्रवादाने वातावरण भारून टाकले. पुलवामा हल्ला व बालाकोट एअर स्ट्राइकनंतर देश राष्ट्रभक्तीत लीन झाला व श्रीमान राहुल गांधी हे स्वातंत्र्यलढय़ाचे महानायक वीर सावरकरांवर अभद्र बोलत राहिले. सावरकरांना पळपुटे म्हणणारे राहुल उरलेली सहानुभूतीही गमावून बसले. मणिशंकर अय्यर छाप पुढाऱयांना घेऊन काँग्रेस चालवण्यापेक्षा पक्ष बरखास्त केलेला बरा असा सल्लाच उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

काँग्रेस पक्षाचे काय होणार, हा प्रश्नच आहे. हा प्रश्न खुद्द पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनाच पडला व उत्तर न सापडल्याने त्यांनी ‘‘काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, पक्षाने नवा नेता निवडावा’’ असे कार्यकारिणी बैठकीत सांगितले. राहुल गांधी यांनी असेही स्पष्ट केले की, आता पक्षाध्यक्ष गांधी घराण्याच्या बाहेरचा ठेवा. त्यामुळे प्रियंका गांधी यांच्या हाती सूत्रे द्या असे बोलणाऱयांची तोंडे बंद झाली. काँगेस पक्षाला यंदा 2014 पेक्षाही दारुण पराभवाला सामोरे जावे लागले व लोकसभेत विरोधी पक्षनेता बनवता येईल इतक्या ‘55’ जागाही काँग्रेस मिळवू शकली नाही. पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्याची नैतिक जबाबदारी राहुल गांधी यांनी घेतली. सत्य असे की, अध्यक्ष आहे, पण पक्ष अस्तित्वात नाही अशी दशा काँग्रेसची झाली आहे. एकतर काँग्रेसवर सतत घराणेशाहीचा आरोप होतो. आता ही घराणेशाहीदेखील काँग्रेसला वाचवू शकत नाही अशी स्थिती आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

काँग्रेसने प्रियंका गांधींना आणले, उपयोग काय झाला? उत्तर प्रदेशात आधी दोन जागा होत्या, आता एक झाली. स्वतः राहुल अमेठीत हरले. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 194 जागा आहेत. त्यातल्या फक्त तीन जागा काँग्रेस जिंकू शकली. 134 वर्षे जुन्या काँगेसला हा अखेरचा धक्का आहे. अर्थात या सगळय़ाचे खापर एकटय़ा राहुल गांधींवर फोडणे चूक ठरेल. राहुल गांधी म्हणजे मोतीलाल किंवा जवाहरलाल नेहरू नव्हेत. इतकेच काय, इंदिरा गांधी व राजीव गांधीदेखील नाहीत. ते फक्त सोनिया गांधींचे पुत्र आहेत व देशाच्या राजकारणात सोनिया गांधींचे कर्तृत्व राजीव गांधींची पत्नी इतकेच आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांचे व्यक्तिमत्त्व लोकांना आकर्षित करीत नाही व त्यांची भाषणे, विचार करण्याची तसेच भूमिका मांडण्याची शैली प्रभावी नाही. राहुल गांधी जे सांगतात त्यातून युवकांनी किंवा देशाने प्रेरणा घ्यावी असे काय आहे? त्यांनी मेहनत केली, कष्ट केले. मात्र त्यास दिशा नव्हती. शुद्ध मराठीत त्यास ढोर मेहनत म्हणावी लागेल. एका जीर्ण झालेल्या पक्षाचे ओझे खांद्यावर घेऊन ते फिरत राहिले. त्यांना साथ कुणाची होती, तर कुणाचीच नाही. चिदंबरम, कमलनाथ, अशोक गेहलोत हे आपापल्या राज्यातले तालेवार नेते, पण स्वतःची मुले निवडून आणण्यातच ते गुंतले. अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री असतानाही त्यांचा मुलगा पराभूत झाला. कार्ती चिदंबरम हे आर्थिक घोटाळय़ात तुरुंगात जाऊन आले, पण चिदंबरम यांनी पक्षाला वेठीस धरून मुलासाठी उमेदवारी मिळवली. हरयाणात भूपेंद्रसिंग हुड्डा यांचे पुत्र पडले. महाराष्ट्रात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पडले. त्यामुळे एक मान्य केले पाहिजे, काँग्रेसकडे नेते आहेत, पण कार्यकर्त्यांचा दुष्काळ आहे असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.

उत्तर प्रदेशात अपक्ष उमेदवारांना जितकी मते पडतात त्यापेक्षा कमी मते काँग्रेस उमेदवारांना पडत आहेत व प्रियंका गांधींनी वेगळे काही करून दाखवले नाही. पुन्हा मोदी यांच्याकडे अमित शहा आहेत व अमित शहा यांच्याकडे संघटना बांधणीचे चातुर्य आहे. राहुल गांधींकडे एकतर पोरखेळ आहे किंवा पेन्शनरांचा क्लब आहे. दिल्लीत त्यांच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली, पण स्वबळावर जिंकून येण्याचे त्यांचे दिवस संपले. हा दोष राहुल गांधींचा नाही, तर थकलेल्या दिशाहीन काँग्रेसचा आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 7:42 am

Web Title: uddhav thackeray congress party rahul gandhi saamana editorial
Next Stories
1 राज्यातील २२८ मतदारसंघांत युती आघाडीवर
2 आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी कोकणात जाणाऱ्या विशेष गाडय़ांची तिकिटे संपली..
3 अ‍ॅड. पुनाळेकर, भावे यांना सीबीआय कोठडी
Just Now!
X