22 July 2019

News Flash

‘पाकचा क्रिकेटर पंतप्रधान, आपल्याकडे स्वप्न बघणारे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष’

आमची युती सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी झाली आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

पाकिस्तानचा क्रिकेटर पंतप्रधान झाला आपल्या देशात असं स्वप्न पाहणारे नेते क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष होतात अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शरद पवार यांचं नाव न घेत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

खुर्ची हे आमचं स्वप्न नाही तर देश हे आमचे स्वप्न आहे. शिवसेना भाजपाची युती झाली ती सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी झाली आहे. आम्ही भगव्यासाठी एकत्र आलो आहोत असेही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवाय काँग्रेस राष्ट्रवादीने आम्हाला देशप्रेम शिकवू नये, असा टोला हाणत त्यांनी पाकड्यांना धडा शिकवा असे आवाहनही केले़ महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकतील असा विश्वास व्यक्त करीत ठाकरे यांनी युतीच्या निवडणूक प्रचाराचा राज्याच्या उपराजधानीत शंखनाद केला़ आम्ही मतदारसंघ आणि माणसही जिंकतो, असेही ठाकरे म्हणाले़

शिवसेना भाजपा युतीचा स्नेहमेळावा नागपुरातील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता़ यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेना नेते व विदर्भाचे समन्वयक दीपक सावंत, मिलिंद नार्वेकर, माजी खासदार दत्ता मेघे, अजय संचेती यांच्यासह भाजपा शिवसेनेचे विदर्भातील पदाधिकारी आमदार, खासदार उपस्थित होते.

 

लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्घव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर तोफ डागली़ पाकिस्तानचा क्रिकेटर पंतप्रधान होतो, तर आपल्याकडे पंतप्रधानपदाची स्वप्न पाहणारे नेते क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष होतात, असा टोला नाव न घेता ठाकरे यांनी शरद पवार यांना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात मोठ्या प्रमाणात कामे झाली़ काही उणीवा होत्या, त्यासंदर्भात आम्ही आवाज उठवला़ त्यावर सरकारने विचार केला़ राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी आम्ही युती केली़ शिवाय काही लोक पंतप्रधान मोदींवर टीका करतात़  त्यांना मोदी परवडत नाही, अशांनी मग दुसरा प्रकाश दाखवावा, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी आहे़ आम्हीही हृदयापासूनच युतीच्या प्रचाराची सुरुवात केली आहे़ आम्ही खरं प्रेम करणारे लोक आहोत, कार्यकर्त्यांनी कोणताही मतभेद न ठेवता एकदिलाने कामाला लागावे असे आदेशही उद्धव ठाकरेंनी दिले.

First Published on March 15, 2019 9:19 pm

Web Title: uddhav thackeray criticised sharad pawar in nagpur