पृथ्वीराज चव्हाण ‘बिनकामाचे’, अजित पवार ‘धरण बांधणारे’ आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या कोणत्या नेत्याचे नाव न घेता त्यांचा उल्लेख ‘दिल्लीपुढे शेपूट हलवणारे’ असा करून शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. हे तिघेही मुख्यमंत्रिपदाला लायक नाहीत. महाराष्ट्राला केवळ शिवसेनाच खंबीर मुख्यमंत्री देऊ शकते असा दावा त्यांनी केला.
शिवसेनेच्या जिल्हय़ातील उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरे यांची मंगळवारी नगरला जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी दोन्ही काँग्रेसपेक्षा भाजपवरच जोरदार आणि अत्यंत कडवट टीका केली. पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख सुहास सामंत यांच्यासह आमदार अनिल राठोड (नगर शहर), शशिकांत गाडे (श्रीगोंदे), आमदार विजय औटी (पारनेर), लहू कानडे (श्रीरामपूर), रमेश खाडे (कर्जत-जामखेड), मधुकर तळपाडे (अकोले), साहेबराव घाडगे (नेवासे) आदी उमेदवार या वेळी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी यांनी या सभेत शिवसेनेत प्रवेश केला.
दोन्ही काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीत आपण भरपूर वस्त्रहरण केले, आता ते पुन्हा करायचे तर आधी त्यांना कपडे घालावे लागतील, नंतर वस्त्रहरण करावे लागेल, असे सांगून ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, आम्हाला युती हवी होती, मात्र भाजपच्या नव्या पिढीला ती नको होती. लोकसभा निवडणुकीला भाजपने आपल्याला बरोबर घेतले. आता सत्ता आल्यानंतर मात्र त्यांना शिवसेना नकोशी झाली आहे. भाजपने आता हिंदुत्व सोडलेले दिसते. तरीही आता छत्रपती शिवाजीमहाराजांचा जयजयकार सुरू आहे. याआधी कधी शिवजयंती साजरी केली नाही, मात्र आता त्यांना छत्रपतींचे आशीर्वाद हवे आहेत. त्यासाठी आता ते सगळय़ा गडांवर जातील, मात्र छत्रपती त्यांना आशीर्वाद देणार नाहीत.
भाजपकडे उमेदवारांचा पत्ता नव्हता, तरीही त्यांना जागा वाढवून हव्या होत्या, अशी खिल्ली उडवून ठाकरे म्हणाले, दिल्लीत शहेनशाह असेल, बादशाह असेल, त्याच्यासमोर मी झुकणार नाही. मी सामान्य जनतेची लढाई लढतो आहे, फक्त शिवरायांपुढेच मी झुकेन. मीही दिल्लीची हुजरेगिरी करू शकलो असतो, ३४ जागा त्यांना वाढवून देऊ शकत होतो, मात्र केवळ सत्तेच्या लालसेपायी शिवसेनेची लक्तरं होऊ देणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर एलबीटी रद्द करू, नगर-पुणे थेट रेल्वेमार्ग करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
आमदार राठोड यांनी नगरकरांचा केवळ शिवसेनेवरच विश्वास आहे, असा दावा केला. गेली २५ वर्षे ही जनता शिवसेनेच्याच पाठीशी उभी असून याही वेळेस वेगळे काही होणार नाही. आपल्याला पराभूत करण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत विरोधकांनी ना ना क्लृप्त्या केल्या, मात्र त्याला नगरकर बधले नाहीत, असे ते म्हणाले.
‘सगळेच अफझलखान’
अफझलखानाच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्याचा ठाकरे यांनी नगरच्या सभेत खुलासा केला. ते म्हणाले, ही टीका आपण कोणा एकावर केली नव्हती. मात्र ‘त्यांना’च ती लागली, कारण त्यांनी स्वत:च ही टीका अंगावर घेतली. एका बाजूने दोन्ही काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूने भाजप, अशी मोठी फौज शिवसेनेच्या विरोधात चालून येत आहे. हे सर्वच अफझलखान आहेत, अशी दुरुस्ती करून शिवसेना या सर्वाशी टक्कर देत महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठीच लढते आहे, असे ठाकरे म्हणाले.
गर्दी रोडावली
एरवी शिवसेनेच्या टोलेजंग सभांची सवय झालेल्या नगरकरांना या सभेत मात्र वेगळेच चित्र दिसले. ठाकरे यांची गेल्या काही वर्षांतील ही बहुधा सर्वात छोटी सभा ठरावी, अशीच होती. शिवसेनेच्या सभेतील गर्दीची परंपरा या सभेने मोडीत निघाली. त्याची चर्चा नंतरही सुरू राहिली.