कोकण दौऱ्यावर आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणतेही राजकीय भाष्य करण्याचे टाळत काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले. त्यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे समर्थन करताना राज्यातील गड-किल्ल्याचे संरक्षण व जतन व्हायला हवे. त्यासाठी खासदार-आमदार प्रयत्न करतील, अशी ग्वाही दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कुणकेश्वर, तारकर्ली, सिंधुदुर्ग किल्ला, आरवली श्री देव वेतोबा, शिरोडा, वेंगुर्ले, नाणोस व आरोंदा येथे भेटी देऊन देवदर्शन केले. त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक होते.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर बोटीतून ठाकरे कुटुंब पोहोचले. तेथील श्री शिवछत्रपती शिवराजेश्वर मंदिरात दर्शन घेतले. त्या वेळी बोलताना ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी पन्नास लाख देण्याचे जाहीर केले होते; पण नेमकी कोणती कामे करावी लागतील त्याचा संदर्भ येत नव्हता म्हणून आश्वासन पूर्तता झाली नसली तरी केंद्रात व राज्यात खासदार, आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन सिंधुदुर्ग किल्ल्याचे संरक्षण व जतन केले जाईल, असे ते म्हणाले.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होत आहे. हे स्मारक व्हायला हवेच. त्याचबरोबर राज्यात गड-किल्ले आहेत. त्यांचे संरक्षण करतानाच डागडुजीसुद्धा व्हायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांच्या कायमचा लक्षात राहण्यासाठी गडकिल्ल्यांचे संरक्षण व जतन व्हायला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर बोलताना सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आरवली मंदिरात श्री देव वेतोबाला वंदन केले. तेथे त्यांचा सत्कारही करण्यात आला. नंतर नाणोस येथील श्री देव वेतोबा व आरोंदा येथील श्री सातेरी मंदिरात बोलताना ठाकरे म्हणाले, कोकणाने शिवसेनेला भरभरून प्रेम दिले आहे. शिवसेना व कोकण यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे कोणतेही राजकीय भाष्य या दौऱ्यात करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
नारायण राणे यांचा पराभव झाल्यानंतर पायात चप्पल घालीन, असा निर्णय घेतलेले शिवसेनेचे अरविंद भोसले यांना आरोंदा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते सोन्याची चप्पल देण्यात आली. या वेळी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
 आरोंदा येथे नाईक यांच्या घरी सोन्याच्या चपला देताना किशोरी पेडणेकर, सुहास पाटकर व पदाधिकारी उपस्थित होते. अरविंद भोसले यांनी या सोन्याच्या चपला मालवण तालुकाप्रमुख बबन शिंदे व हरी खोबरेकर यांच्याकडे सुपूर्द करून त्या माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्याकडे द्याव्यात, अशी विनंती केली.
 सोन्याच्या चपला अरविंद भोसले यांना आरवली येथे देण्यात येणार होत्या, पण श्री देव वेतोबाच्या स्थळात हा कार्यक्रम करण्यात आला नाही.