मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा क्षोभ शमवावा; उद्धव यांचे आवाहन

‘‘मुख्यमंत्री कोण होईल, याची मला पर्वा नाही. मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा क्षोभ शमवावा. अन्यथा, ते सत्तेची आसने जाळून खाक करतील,’’ असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला.

विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री भाजपचाच राहील, असे स्पष्ट सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भाजपच्या बैठकीत केले होते. तसेच फडणवीस सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी राज्यव्यापी यात्रा काढण्याची घोषणा भाजपने या बैठकीत केली होती. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावतानाच शेतकऱ्यांचा क्षोभ कमी करण्याचे आवाहन केले.

‘‘मुख्यमंत्री आमचा होणार की तुमचा होणार, याची मला पर्वा नाही. मी शेतकऱ्यांशी बांधील आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी माझे मैत्रीचे संबंध आहेत. आमचे जुळले आहे. युती घट्ट आहे. युती करताना शेतकऱ्यांना कर्जमुक्ती ही पहिली अट होती. ती मान्य करून फडणवीस यांनी कर्जमुक्ती जाहीर केली. पीक विमा योजना व कर्जमाफी याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचतात की नाही हे तपासण्यासाठी दौरे करत आहोत,’’ असे उद्धव यांनी स्पष्ट केले.

..तर बँक अधिकाऱ्यांना धडा शिकवू

कर्जमाफी झाल्यानंतरही शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडवणूक करणाऱ्या बँकांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सरकारी मार्गाने काय व्हायचे ते होईल, पण बँकांच्या अधिकाऱ्यांना शिवसेना आपल्या पद्धतीने सरळ करील, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

राम मंदिर होणारच! अयोध्येत राम मंदिर होणारच आहे. त्यावर टीका करणाऱ्यांची पर्वा करत नाही. राम मंदिर ही आपली वचनबद्धता आहे. देशात रामराज्य आले हे सांगण्यासाठी राम मंदिर उभारावयाचे आहे, असे उद्धव म्हणाले.