“पाच वर्षे ज्यांच्यासोबत आपण संसार केला, पाच वर्षे ज्यांच्यासोबत राज्य चालवलं आणि ज्यांना आपण मित्र म्हणतो अशांशी फोनवरही मी बोलणार नाही ही भूमिका मला समजू शकत नाही. राजकारणात मी यापूर्वी अशी भूमिका कधीही पाहिलेली नाही असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा‘ या ‘ लोकसत्ता‘ तर्फे आयोजित वेबसंवादात आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली. या कार्यक्रमात नेमकं निवडणूक निकालानंतर काय घडलं होतं असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

“निवडणुकीच्या निकालानंतर आमच्यासोबत चर्चाच करायची नाही असा निर्णय तिसऱ्या चौथ्या दिवशीच घेतला. मी उद्धवजींना फोन केला होता. त्यांनी तो फोन घेतला नाही. कोणीही बोलायचं असेल तर अडीच वर्षे दिली असं जाहीर करा, त्याशिवाय बोलणी होणार नाहीत अशी भूमिका शिवसेनेने घेतली. त्यानंतर मी त्यांना वारंवार हे कळवलं की आपण चर्चा करु, चर्चेतून मार्ग काढू, अडीच वर्षांवरही चर्चा करु. आधी अडीच वर्षांची घोषणा करा त्याशिवाय आम्ही चर्चा करणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली.” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे

“माननीय उद्धवजी माझ्याशी बोलायला तयार नव्हते. ते कुणाशीही बोलायला तयार नव्हते. आम्हीही राष्ट्रीय पक्ष आहोत. अशा प्रकारची भूमिका एखाद्या पक्षाने घेतल्यानंतर आम्हालाही दहा राज्यांमध्ये युती चालवावी लागते. अशात हे भाजपा सहन कसं करेल? ते माझ्याशी बोलायला तयार नव्हते, इतर कुणाशी बोलायला तयार नव्हते तर मग केंद्रातला माणूस त्यांच्याशी बोलायला येईल कसा? लोकसभेच्या वेळी आधी राज्यातल्या नेत्यांची चर्चा झाली. त्यानंतर अमित शाह आले आणि मग पत्रकार परिषद झाली. विधानसभा निवडणूक निकालानंतरही चर्चेतून प्रश्न सुटले असते आणि त्यानंतर केंद्रातले नेते येऊ शकले असते. पण उद्धवजींनी चर्चाच केली नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.