२१ मार्च रोजी देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. त्यानंतर तब्बल तीनवेळा लॉकडाउनला केंद्र सरकारनं मुदतवाढ दिली. चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन ३१ मे रोजी संपत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार लॉकडाउनबद्दल काय निर्णय घेणार याकडे राज्यातील जनतेचे कान लागले आहेत. एक जूनपासून लॉकडाउन हटवणार की, आणखी शिथिलता देऊन कायम ठेवणार, एक जूननंतर महाराष्ट्र कसा असेल? या प्रश्नाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.
महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद कार्यक्रमाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीने झाली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सर्वांगीण परिस्थितीवर भाष्य केलं. मुख्यमंत्री म्हणाले,”करोनाबरोबर जगायला शिका हे म्हणणं ही आपली अपरिहार्यता आहे. त्यामुळे लॉकडाउन हा शब्द वापरणं आता बंद करायला हवं. करोनानंतरचं जग बदलेलं असेल. करोनासोबत जगायचं म्हणजे आपल्याला जीवनशैली बदलावी लागणार आहे. लॉकडाउन हा शब्द म्हणण्यापेक्षा स्वतः लॉक सोबत घेऊन फिरा,” असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. मास्क घालणं, सुरक्षित अंतर राखणं, सॅनिटाझर वापरणं, वारंवार तोंडाला हात न लावणं अशी खबरदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले.
“करोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्य सरकारला परिस्थितीची कल्पना आली होती. त्यामुळे काय काय करता येईल, याची तयारी सुरू केली होती. आरोग्याच्या सुविधा उभारण्यासाठी लष्कराचं मार्गदर्शन घेण्याची, ते तातडीनं हॉस्पिटल आणि अन्य सुविधा कशा उभ्या करतात, याचीही माहिती घेण्याची तयारी होती. पण, त्यापूर्वीच लॉकडाउन जाहीर झाला. केंद्रानं लॉकडाउन जाहीर करण्याआधीच राज्य सरकारनं एक एक गोष्ट बंद करायला सुरूवात केली होती. आता एकदम लॉकडाउन उठवता येणार नाही. परिस्थितीचा आढावा घेऊन एक एक गोष्ट सुरू केली जाईल. आतापर्यंत बऱ्याच गोष्टी सुरू केल्या आहेत,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 28, 2020 2:58 pm