अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता काहीसा जोर धरू लागला आहे. रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघही याला अपवाद राहिलेला नाही. गतसप्ताहात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, केंद्रीय मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी यांच्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडधडणार आहे.
ठाकरे यांची सेना उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारासाठी बुधवारी रत्नागिरीत जाहीर सभा होणार असून सर्व पदाधिकारी व शिवसनिक ही सभा आठवणीत राहावी यासाठी जय्यत तयारीत गुंतले आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख प्रदीप तथा बंडय़ा साळवी व शहरप्रमुख प्रमोद शेरे यांनी माहिती देताना सांगितले की, रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार उदय सामंत यांना मोठय़ा मताधिक्याने विजयी करण्यासाठी पदाधिकारी व शिवसनिकांनी कंबर कसली असून सर्व जण एकदिलाने पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. त्यामुळे उदय सामंत मोठय़ा मताधिक्याने निश्चितच विजयी होतील, असा विश्वास जिल्हाप्रमुख महाडिक यांनी व्यक्त केला. मतदारसंघातील सर्व निष्ठावंत शिवसनिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.  विचाराने घडविला असून तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश मानणारा आहे आणि म्हणूनच या मतदारसंघात शिवसेनेचा विजय ही काळय़ा दगडावरील पांढरी रेघ आहे, असा दावा महाडिक यांनी केला. शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ही जाहीर सभा बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वा. येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू असून ही सभा रत्नागिरीकरांच्या कायम स्मरणात राहावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. शिवसनिकांनी या मतदारसंघात सेनेचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी कंबर कसली आहे. आता या सभेत ठाकरे कोणाकोणावर तोफ डागणार, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.