मराठवाडय़ातील नांदेड, परभणी, जालना या तीन जिल्ह्य़ांमधील दुष्काळाची पाहणी करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना टीकेचे लक्ष्य केले. दौऱ्यानंतर औरंगाबाद येथे पत्रकार बैठकीत इशारे देत त्यांची भाषा प्रत्यक्षात समन्वयाचीच असल्याचे दिसून आले. सत्तेत सेनेचा वाटा असेल का, या प्रश्नाचे उत्तर टाळत खडसे यांच्यावर दुसऱ्या दिवशीही खरमरीत टीका केली. काल ‘ते’ अजित पवारांची भाषा बोलत होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी शरद पवारांची भाषा बोलू लागले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. भुईमुगाच्या शेंगा कोठे लागतात, हे उद्धव ठाकरे यांना माहीत आहे काय, या खडसे यांच्या कथित वक्तव्यावरून वाद रंगला आहे.
पत्रकार बैठकीची सुरुवात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आकडेवारीच्या भाषेत केली. सरकारी यंत्रणेकडून मिळालेली माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दुष्काळाची भीषणता सांगण्यास सुरुवात केली. मराठवाडय़ात सलग ३ वर्षांपासून दुष्काळ पडत आहे, असे सांगत राज्यपालांना शिवसेना साकडे घालेल, असे सांगितले. शिवसेना आज जी आक्रमकता दाखवत आहे, ती अधिवेशनापूर्वी सत्तेत सहभागी झाल्यानंतर दिसेल काय, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी खुबीने टाळले. उद्याचा विचार करीत नाही. स्वप्नरंजन करण्यात काय अर्थ? मराठवाडय़ातील शेतकऱ्याला दिलासा मिळावा, या साठी विरोधी पक्ष म्हणून काम करत राहू, असे ते म्हणाले.
एकाही शेतकऱ्याने राजकारणाच्या अनुषंगाने प्रश्न विचारला नाही. त्यामुळे विचारलेल्या प्रश्नाचा आणि दुष्काळाचा संबंध नाही असे म्हणत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले. जायकवाडीच्या पाण्याबाबतही शिवसेनेची भूमिका मवाळ झाल्याचे आज स्पष्ट झाले. नगर व नाशिक जिल्ह्य़ांतून जायकवाडीच्या पाण्याची अडवणूक होते, असे म्हणताच पाण्यावरून गट-तट पडू नये. दोन्हीकडच्या आमदारांशी बोलू. यात तंटा-वाद नको. गैरसमज निर्माण व्हायला नको, अशी भूमिका मांडली. यापूर्वी जायकवाडीप्रश्नी शिवसेनेच्या नेत्यांनी तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना घेराव घातला होता. या प्रश्नी मोर्चेही काढले होते. पाण्याच्या वादात वाद नको, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली.
कोकणातून वाहून जाणारे पाणी मराठवाडय़ात आणता येऊ शकेल, अशा आशयाची वक्तव्ये खडसे यांनी केली होती. त्यावर ठाकरे यांनी, हे शक्य आहे का, असा सवाल केला. मात्र, पाण्याच्या अनुषंगाने नगर व नाशिकमधील शिवसेनेचे आमदार कोणती भूमिका घेणार, हे मात्र सांगितले नाही. पूर्वी याच प्रश्नी इशारे देणाऱ्या शिवसेनेने या प्रश्नी भूमिका मवाळ केली. केंद्रातील युतीबाबत त्यांनी प्रश्नही विचारू दिला नाही.
ठाकरी भाषा न बोलता..!
उद्धव ठाकरे यांना भुईमुगाची शेंग खाली लागते की वर, असा सवाल खडसे यांनी केल्याचे पत्रकार बैठकीत विचारण्यात आले आणि ठाकरे म्हणाले, काल मी म्हणालो होतो, खडसे हे अजित पवारांची भाषा बोलत आहेत. आज ते शरद पवारांची भाषा बोलताहेत, असे म्हणावे लागेल. खडसेंच्या वक्तव्यांना उत्तर देता येत नाही असे नाही. खरे तर ते बाळासाहेबांनीच दिले आहे. पूर्वी शरद पवार म्हणाले होते, रताळे कुठे लागतात? त्यांना बाळासाहेबांनी दिलेले उत्तर आठवावे आणि तेच खडसेंना लागू आहे. त्यांचे रताळे होते, यांची भुईमुगाची शेंग. त्यामुळे उत्तर तेच आहे.