मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्तीनिमित्तानं उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली. कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं. त्याचबरोबर विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना उत्तर दिलं होतं. या मुलाखतीवरुन भाजपानं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा संदर्भ देत टीका केली आहे. “शाळा, परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, आरक्षण सगळ्याबाबतीत संभ्रम.. कापूस, धान खरेदी झाली नाही. शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही, याची हमी नाही. अहो, जिथे गणपतीची उंची, लोकल ट्रेनचा निर्णय सुद्धा होऊ शकत नाही. तिथे वर्षपूर्तीचे कसले “अभिनंदन” आणि कसल्या मुलाखती!,” असं म्हणत शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी उद्धव ठाकरेंची अवस्था- नारायण राणे

“परावलंबी वर्ष! तिघाडीच्या परावलंबी सरकारने महाराष्ट्राला वर्षभरात परावलंबी केले. कोणतीही कणखर भूमिका नाही. ठोस निर्णय नाही. शेतकरी, कामगार, श्रमिक, बलुतेदार, छोटे उद्योग यांना कसलीही मदत केली नाही. खंबीर आधार नाही. दुसऱ्याकडे बोट दाखवून रडगाणे गाणारे नेतृत्व दिसले!,” असं टीकास्त्र शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर डागलं आहे.

आणखी वाचा- “जनतेने बहुमत दिलेलं नसतानाही…,” पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारवर टीका

काय म्हणाले होते ठाकरे?

“करोनावरून विरोधकांकडून तुमच्यावर टीका होतेय सातत्याने,”असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले होते,”मी तुम्हाला सांगितलं ना की, किडनी विकार असेल, हृदयविकार असेल असे सगळ्यांच्या विकारांचे झाले, पण डोक्याचे विकार त्यात घ्यायचे राहिले. आता ते टीका करत असतील तर त्याला मी काय करू. ठीक आहे. हात धुतो आहे. जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन. डोक्यावरील उपचारांची प्रक्रिया सुरू आहे. आहे. आहे. तयारी आहे. डोक्यावर उपचार म्हणजे फक्त चंपी मालिश नाही करणार,” असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं.