राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे जनमताविरुद्ध आलं अशी टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. सरकार जनमताविरुद्ध असतं तर वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी शिवतिर्थ फुलून गेलेलं आपल्याला दिसलं नसतं. शिवतिर्थावर एवढी गर्दी पहायला मिळाली नसती, तिथं कोणी फिरकलंही नसतं. मात्र तसं झालं नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. याच मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करुन महाविकास आघाडी सरकारने हे सरकार चालणार नाही असं म्हणणाऱ्यांचे दात पाडले आहेत असंही उद्धव यांनी म्हटलं आहे.

मुलाखतीच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंना सरकार पडण्यासंदर्भात विरोधकांनी केलेल्या वक्तव्यांवरुन प्रश्न विचारण्यात आला. “हे सरकार ११ दिवसही चालणार नाही, तीन महिने ही चालणार नाही. हे सरकार आपल्या ओझ्यानेच पडेल अशी भाकितं अनेक ज्योतिषांनी महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर वर्तवली,” असा प्रश्न राऊत यांनी विचारण्यास सुरुवात केली असता मुख्यमंत्री, “असं बोलणाऱ्यांचे दात पडत आले,” असा टोला लगावला. त्यावर राऊत यांनी, तुम्ही ते दात कसे पाडले, असा प्रश्न विचारला.  या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. “पहिली गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणाने मी महाराष्ट्रातील मायबाप जनतेला साष्टांग दंडवत घालतो. चमत्कार हा शब्द वापरलाय त्याला काहीजण विरोध करतील. काही वर्षांपूर्वी अंधश्रद्धांविरोधी कायदा आला त्यामुळे या चमत्कार शब्दाला काहीजण आक्षेप घेतील. त्यामुळे मी इतकचं म्हणले की सर्वजण एकत्र आले तर आणि तरच हे सत्य आहे ते दिसू शकतं,” असं म्हटलं.

“महाराष्ट्रात अशाप्रकारे सत्तापरिवर्तन होणं हे अचंबित करणारं होतं स्थापन झालेली सरकार हा एक चमत्कारच होता,” असं राऊत यांनी म्हटलं. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी हे सरकार जनतेच्या पाठिंब्यावरच सत्तेत आल्याचं म्हटलं आहे. “महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रेम, विश्वास आणि आशिर्वाद पाठीशी होता. अशा राजकीय घडामोडी घडतात त्या प्रत्येक घडामोडीमागे जनता असतेच असं नाही. आज एक वर्षापूर्वी शिवतिर्थ फुलनं गेलं होतं हे आपण सर्वांनी पाहिलं. काहींना असं वाटतं की जनमताविरुद्ध हे झालं. पण तसं असतं तर शिवतिर्थावर त्या वेळेला (शपथविधीला) कोणी फिरकलंही नसतं,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

आणखी वाचा- …पण डोक्याचे विकार त्यात घ्यायचे राहिले; उद्धव ठाकरेंचं भाजपाला प्रत्युत्तर

तसेच महाविकास आघाडी सरकारची मोट बांधणं कठीण काम होतं असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. त्याचवेळ त्यांनी विरोधकांनाही टोला लगावला. “हे सगळं घडवणं फार कठीण होतं. तिन्ही पक्ष एकत्र येताना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकणार नाही असा काही जणांचा कयास होता. तो कयास बरोबर येईल असं अनेकांना वाटलं होतं. शिवसेना आपल्या मागे फरपटतच येईल. ती आपल्या शिवाय काही करुच शकणार नाही असं ज्यांना वाटत होतं, त्यांचा जो समज होता तो आपण फोल ठरवला,” अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी भाजपाचे नाव न घेता विरोधकांना टोला लगावला.

आणखी वाचा- हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?; मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला

शरद पवारांनी हे सरकार स्थापन करण्यासाठी होकार देत राजकीय धाडस दाखवलं असंही उद्धव ठाकरे म्हणाले. काँग्रेस, सोनियाजी, राष्ट्रवादी आणि पवारांनी शिवसेनेसोबत एकत्र येत सरकार स्थापन करण्याचं धाडस दाखवल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.