राज्यातील करोना परिस्थिती अजुनही कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून गंभीर परिस्थिती होताना दिसत असून, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. सरकारनं हात धुवायला सांगण्यापेक्षा काहीही केलेलं नाही, असा आरोप विरोधकांकडून म्हटलं जात आहे. विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलं. सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीवेळी “करोनाशी लढण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे असे दिसते. विशेषतः ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही संकल्पना केवळ देशातच नव्हे, तर जगात नवीन आहे आणि ती महाराष्ट्रात यशस्वी होताना दिसतेय,” असं राऊत म्हणाले. या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,”मला तेच सांगायचंय की सर्वांनी खूप सहकार्य केले. अगदी ही मोहीम राबवण्यात आपले डॉक्टर्स आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत. आशा, अंगणवाडी सेविका, त्यानंतर महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा, त्यानंतर स्वयंसेवी संस्था सगळ्याचंच यात अमाप योगदान आहे. की साधा विचार करा, आपल्या घरी दोनदा-तीनदा ही टीम गेली आहे आणि उंच बिल्डिंग असेल, लिफ्ट नसेल तरी पायपीट करून वर यायचं. चौकशी करायची. कुणी करोनाग्रस्त आहे का? या मोहिमेतून जो माझा हेतू होता एक तर जनजागृती करणं, महाराष्ट्राच्या आरोग्याची एक तपासणी चौकशी करणं आणि ज्यास आपण एक हेल्थ मॅप म्हणतो, कसा आहे महाराष्ट्र, महाराष्ट्राचं आरोग्य कसं आहे? त्याच्यात आता बहुतेकांनी स्वतःहून सहव्याधींचीही माहिती दिली आहे. त्या कोणाकोणाला आहेत. मग कार्डिअॅक प्रॉब्लेम कुणाला आहे, डायबेटीस कुणाला आहे, कॅन्सर कुणाला आहे? इतर व्याधी कुणाला आहेत, किडनीचे विकार कुणाला आहेत? या सगळ्यांची आता आपल्याकडे नोंद झाली,” ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा- हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?; मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला

त्यावर “हे तुम्ही व्यवस्थित समजावून सांगताय, पण हे तुम्ही जे सांगता ते सांगत असताना विरोधकांकडून तुमच्यावर टीका होतेय सातत्याने,”असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले,”नाही. माझं वाक्य तुम्ही अर्धवट तोडलंत. मी तुम्हाला सांगितलं ना की, किडनी विकार असेल, हृदयविकार असेल असे सगळ्यांच्या विकारांचे झाले, पण डोक्याचे विकार त्यात घ्यायचे राहिले. आता ते टीका करत असतील तर त्याला मी काय करू. ठीक आहे. हात धुतो आहे. जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन. डोक्यावरील उपचारांची प्रक्रिया सुरू आहे. आहे. आहे. तयारी आहे. डोक्यावर उपचार म्हणजे फक्त चंपी मालिश नाही करणार,” असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं.