जनतेची कामे करण्यापेक्षा राज्य सरकारकडून जाहिरातबाजीवर उधळपट्टी केली जात आहे. अशा प्रकारे जनतेच्या मुळावर येणार असाल तर सरकार खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी बुधवारी दिला.

शहरातील माळनाका येथे बांधण्यात आलेला स्कायवॉक आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर पुन्हा एकवार कडाडून टीका करताना ते म्हणाले की, सरकारकडे निधीची कमतरता असल्याचे कारण देत अनेक विकासकामांना कात्री लावली जात आहे, पण त्याच वेळी गेल्या तीन वर्षांमधील कामांच्या प्रचारासाठी जाहिरातींवर मोठय़ा प्रमाणात खर्च केला जात आहे. अशा फालतू जाहिरातबाजीने सामान्य जनतेचा काहीही लाभ होत नसतो. जनतेने त्यासाठी मते दिलेली नाहीत. हा खर्च करण्यापेक्षा तो पैसा विकासकामांकडे वळवला तर जाहिरातींची गरजच उरणार नाही; पण हे लक्षात न घेता, ज्या अपेक्षेने आम्ही या सरकारला पाठिंबा दिला त्या पूर्ण होणार नसतील तर मला रस्त्यावर उतरावे लागेल.

या कार्यक्रमापूर्वी ठाकरे यांच्या हस्ते राजापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले. तो धागा पकडून ते म्हणाले की, छत्रपतींच्या नावाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना लागू करण्यात आली आहे; पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही. शेतकरी कर्जमुक्त होणार नसतील तर महाराजांचे नाव बदनाम करू नका. तुमच्या करंटेपणामुळे त्यांना काळा डाग लावू नका. गुजरात विधानसभेच्या निवडणुका नसत्या तर या सरकारने वस्तू व सेवा करांमध्ये बदल केले नसते आणि एवढे करूनही गुजरातच्या निवडणुका हरलात तर देशामध्ये थारा राहणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

प्रकल्पविरोधात आम्ही जनतेबरोबर

या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना, सेनेने उचललेले मुद्देच आता इतरही मांडू लागले आहेत, असे निदर्शनास आणून देऊन ते म्हणाले की, जैतापूरबाबत आमची जी भूमिका होती तीच प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत आहे. या दोन्ही विषयांवर आम्ही जनतेबरोबर राहणार आहोत. गुजरातच्या निवडणुकीत हार्दिक पटेलचे व्यक्तिगत जीवन महत्त्वाचे नसून त्याने उठवलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारे मूळ विषयाला फाटे फोडल्यामुळे जनतेचा असलेला रोष कमी होणार नाही, असेही मत ठाकरे यांनी व्यक्त केले.