शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री नांदेडच्या विकासासाठी २५ हजार कोटी रूपये देऊन असे आश्वासन देतील. मात्र, नांदेडच्या लोकांनी त्यांच्या आश्वासनाला भुलू नये. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीतही शहराच्या विकासासाठी ६५०० कोटी रूपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, यातला एकही पैसा कल्याण- डोबिंवलीकरांच्या वाट्याला अजून आला नाही. यानंतर भाजप सरकारकडून नांदेडला स्मार्ट सिटी बनवण्याची टूम काढण्यात आली. मध्यंतरीच्या काळात शेतकऱ्यांचे ३५ हजार कोटींचे कर्ज माफ करून असे सरकारकडून सांगण्यात आले. मात्र, सरकारची ही कर्जमाफी ऑनलाईन प्रक्रियेच्या जंजाळात अडकून राहिलेय. त्यामुळे अशा थापा मारणाऱ्या पक्षाला तुम्ही निवडून देणार का, असा सवाल उद्धव यांनी नांदेडकरांना विचारला.

यावेळी उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले. पंतप्रधान देशात १५ दिवस आधीच दिवाळी आली असे म्हणतात. मात्र, त्यांनी जरा शेतकऱ्यांच्या घरात जाऊन डोकवावे, म्हणजे त्यांना दिवाळी आलेय किंवा नाही, हे समजेल. सरकार शेतकऱ्यांचे कर्जाचे डोंगर रचून ठेवते. त्यानंतर एक वीट काढून बघा कर्जमाफी केली की नाही, असे म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेते. सध्या वृत्तवाहिन्यांवर पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. हे बघून एखादा ऑस्कर सोहळाच सुरू आहे की काय, असे वाटते. मात्र, गुजरातच्या निवडणुका तोंडावर आल्यानंतरच पंतप्रधानांना त्यांची शाळा का आठवली, असा सवाल उद्धव यांनी विचारला. याशिवाय, आजच्या भाषणात उद्धव यांनी शिवसेना सोडून भाजपच्या वाटेवर असलेले प्रतापराव चिखलीकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. नांदेडमध्ये निवडणुकीच्या काळात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणारे बेडूक वाढले आहेत. मात्र, मी त्यांना स्वत:हून पक्षातून काढणार नाही. अन्यथा त्यांना आयतेच कारण मिळेल आणि ते भाजपच्या कळपात जाऊन सामील होती. विधानसभा निवडणुकीत मीच त्यांच्या प्रचारासाठी आलो होतो, ते शिवसेनेच्या नावावर निवडून आलेत. त्यामुळे हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान उद्धव यांनी दिले. तर इतर पक्षांमधील नेत्यांना गळाला लावणाऱ्या भाजपवरही त्यांना शरसंधान साधले. भाजप २०१९ सालच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे बोलले जाते. मात्र, ही निवडणूक त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर लढवावी. त्यांच्यात दम नाही म्हणून ते सध्या इतर पक्षातील पैलवान गोळा करत आहेत, असे उद्धव यांनी म्हटले.