ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात तब्बल दोन वर्षांनंतर बिबटय़ाचा मृत्यू, वाघाची शिकार यासारखे प्रकार उघडकीस येत असतानाच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा या व्याघ्र प्रकल्पातील दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, ठाकरे यांचा हा दौरा पूर्णपणे खासगी असून छायाचित्रणासाठी ते येथे आल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यासोबत मुलगा तेजस ठाकरे व वनखात्याचे माजी प्रधान सचिव व मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी सोबत आहेत.
ते २० फेब्रुवारीलाच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाले. २३ फेब्रुवारीपर्यंत ते या व्याघ ्रप्रकल्पात फिरणार असून घोसरी येथील पुनम धनवटे यांच्या रिसॉर्टमध्ये त्यांचा मुक्काम आहे. त्यांचा हा दौरा अत्यंत खासगी असून जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनासुद्धा त्यांच्या दौऱ्याची सूचना देण्यात आलेली नाही. मोहर्ली गेटवरुन गर्दी असल्याने खुटवंडा गेटवरून ते विशेष जिप्सीने निघतात. वाघाने त्यांना कालही दर्शन दिले आणि आजच्या फेरीतसुद्धा त्यांना व्याघ्रदर्शन झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, त्यांचा हा दौरा वाघाची शिकार उघडकीस आल्यानंतर लागलीच झाल्याने विशेष चर्चेत आला आहे. दोन वर्षांपूर्वी याच व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या एकापाठोपाठ एक शिकारी उघडकीस आल्या होत्या. त्यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या व्याघ्र प्रकल्पाचा दौरा केला होता. त्यांचाही दौरा खासगीच होता, पण या शिकारीची दखल घेत त्यांनी वाघांच्या शिकाऱ्यांना ताबडतोब शोधून काढा असे आदेश दिले होते. त्याचवेळी शिकाऱ्याला शोधून काढणाऱ्यास पाच लाख रुपये इनाम त्यांनी जाहीर केला होता. शिकाऱ्यांना पकडल्यानंतर त्यांनी आपला शब्द पाळला. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नुकत्याच झालेल्या वाघाच्या शिकारीची दखल घेतात का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध होत असताना आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मारेकऱ्याला त्वरित शोधून अटक करण्याची मागणी होत असताना ठाकरे यांच्या या दौऱ्यावर अनेकांनी प्रश्न उभे केले आहेत. शिवसेनेचे प्रमुख या नात्याने त्यांची यावर काय प्रतिक्रिया आहे, याकडेही सर्वाचे लक्ष लागले आहे.