शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संघटित होऊन प्रचाराला लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ठाकरे यांच्या बुधवारी सावंतवाडी-मालवणमध्ये प्रचार सभा झाल्या. त्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करत रात्री रत्नागिरीत त्यांनी शेवटची प्रचार सभा घेतली. युती तुटल्याच्या पाश्र्वभूमीवर काहीसा सैरभर झालेला शिवसैनिक त्यांच्या या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे पक्षसंघटनाला प्राधान्य देत प्रचारामध्ये जुंपला गेला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी (दीपक केसरकर) आणि कुडाळ (वैभव नाईक) हे दोन मतदारसंघ शिवसेनेच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे आहेत. विशेषत: कुडाळमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणे लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने रिंगणात उतरले आहेत. पण त्यांना पुन्हा एकवार पराभवाची चव चाखायला लावण्याचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मनोदय आहे. त्या दृष्टीने ठाकरे यांच्या प्रचार सभेला महत्त्व होते. मालवणात राणे यांच्या कारनाम्यांवर घणाघाती टीका करत त्यांनी पक्षकार्यकर्त्यांना प्रचाराच्या कामासाठी प्रोत्साहित केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी व चिपळूण या तीन मतदारसंघांमधील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी रात्री रत्नागिरीत सभा आयोजित करण्यात आली. प्रचाराचा कालावधी संपण्यापूर्वी (रात्री १०) जेमतेम पंधरा मिनिटे आधी ठाकरे सभास्थानी पोचले आणि लगेच माईकचा ताबा घेऊन त्यांनी भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदी यांची येत्या सोमवारी भाजपा उमेदवार बाळ माने यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीत सभा आहे. त्या पाश्र्वभूमीवर बोलताना ठाकरे यांनी, दिल्लीच्या शहेनशहापुढे झुकणार नाही, अशी गर्जना करत मोदींच्या कार्यशैलीवर टीका केली. जैतापूर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला सेनेचा विरोध कायम राहील, असेही त्यांनी जाहीर केले.
रत्नागिरी मतदारसंघातून सेनेने राष्ट्रवादीचे माजी मंत्री उदय सामंत यांना उमेदवारी दिली आहे. अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी ते शिवसेनेत आल्यामुळे पक्षकार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता होती. गेल्या काही दिवसांत सेनेच्या जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन हे वातावरण निवळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ठाकरे यांनी भाषणात सामंत यांचा मंत्रिपदाचा त्याग करून आलेला नेता, अशा शब्दांत गौरव करून त्यांना विजयी करण्याची जबाबदारीच जमलेल्या शिवसैनिकांवर टाकली. त्यामुळे येत्या काही दिवसांत कार्यकर्ते जास्त जोमाने व संघटितपणे प्रचारात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.