हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये दाखल झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपाला चिमटे काढण्याची एकही संधी सोडली नाही. आंतरराष्ट्रीच चहा दिनाचा संदर्भ देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चहापानावर बहिष्कार टाकण्यावरून भाजपाला सुनावलं.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “नागपूरमध्ये मी यापूर्वी अनेकदा आलो आहे. पण, मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच आलो आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान आयोजित केलं जातं, असं माझे सहकारी जयंत पाटील यांनी मला सांगितलं. माझी अशी अपेक्षा होती की, प्रथा चहापानाची आहे. पण, या प्रथेमध्ये आणखी एक पोटप्रथा झाली आहे. ती पोटप्रथा म्हणजे विरोधकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकायचा. आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे. आपल्या पंतप्रधानांची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे. एक चहावाला व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला. त्याचा आपल्याला अभिमान आहे. तो अभिमान बागळत असताना पंतप्रधान ज्या पक्षाचे नेते आहेत. त्या पक्षानेच बहिष्कार टाकावा. त्यांच्यात मतभेद असतील अस मला वाटत नाही. पण पक्षाच्या धोरणाशी किती सुसंगत आहे,” अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आमचा शपथविधी होऊन पंधरा दिवस झाले आहे. मुंबईतील अधिवेशन दोन दिवसांचं होते. त्यात काय झालं सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानीपासून आमच्या कामाची सुरूवात होत आहे. जनतेच्या आशिर्वाद हेच आमचं पाठबळ आहे. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी समर्थ ठरू. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचं मी बोललो आहे. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आता हातात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच चांगला निर्णय सरकार घेईल,” असंही ठाकरे म्हणाले.

सावरकरांविषयी शिवसेनेच्या भूमिकेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहोत. भिन्न विचारांची माणसं आहोत. कालही आमच्या विचारात भिन्नता होती. आजही त्यात भिन्नता आहे. सावरकरांविषयीची भूमिका शिवसेनेनं मांडली आहे. मात्र,
सरकार चालवण्यासाठी समान कार्यक्रम ठरवला आहे. सरकार म्हणून आमच्यात एकवाक्यता आहे,” असं ठाकरे यावेळी म्हणाले.