मिशन बिगिन अगेन… अर्थात पुनःश्च हरिओम हा नारा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. हळूहळू आपण सगळं काही सुरु करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो आहोत. करोनाशी आपला लढा सुरुच आहे. गर्दीला संमती दिलेली नाही, सभा समारंभ यांना परवानगी नाही. बाहेर फिरतानाही अंतर ठेवायचं आहे. या अंतरामुळेच आपण करोनाला एका अंतरावर ठेवणार आहोत. ३ जून पासून याची सुरुवात करतो आहे. ५ तारखेपासून दुकानं सुरु करण्यात येत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकानं सुरुवातीला एका बाजूची दुकानं उघडायची आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची दुकानं उघडायची. गर्दी अजिबात करायची नाही. झुंबड उडाली तर बंद करण्याची वेळ यायला नको. महाराष्ट्रात शिस्तीचं असं उदाहरण घालून द्या की देशाने आपलं उदाहरण समोर ठेवलं पाहिजे. असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

लॉकडाउन करणं हे सायन्स असेल तर लॉकडाउन उघडणं हे एक आर्ट आहे. पावसाळा येतो आहे. पाऊस पडला की शेवाळ साठतं. त्या शेवाळावरुन आपला पाय घसरु नये म्हणून काळजी घेतो. प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागणार आहे. गेल्या आठवड्यात मी संपूर्ण यंत्रणेची बैठक घेतली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती. करोनासोबत जगायला शिका हे आपण सगळ्यांकडून ऐकतो आहोत. ते जगायचं म्हणजे काय? तर मास्क लावणं हे अपरिहार्य आहे. तसेच शिस्त ही प्रत्येकाने पाळायचीच आहे. बाहेर जाऊन आल्यानंतर हँडवॉशने हात धुणं, सॅनेटायझर वापरणं या सगळ्या गोष्टी वापरा. शक्यतो ६५ वर्षे वयाच्या वरील असलेल्या लोकांनी बाहेर पडू नये असं आवाहन मी तुम्हाला करतो आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

८ जूनपासून आपण आपली कार्यालयं सुरु १० टक्के उपस्थितीने आपण ही कार्यालयं सुरु करतो आहोत. काय काय परिणाम होईल त्याकडे लक्ष असणार आहोत असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली. चाचण्यांची संख्या वाढवणं हेदेखील महत्त्वाचं आहे. टेस्टसाठी जी किंमत आहे ती आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो आहोत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळली तर तातडीने टेस्ट करा. आपली आणि आपल्या घरातल्यांची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.