News Flash

‘मंत्रिमंडळ विस्ताराचा लवकरच निर्णय, खातेवाटपही अंतिम टप्यात’

कोणाला कोणतं खातं मिळणार आणि मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार

गेल्या महिनाभरातील नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहा मंत्र्यांनी शिवाजी पार्कवर शपथ घेतली. पण कोणाला कोणतं खातं मिळणार आणि मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागले आहे. पण राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीत याबाबत मोठा खुलासा केला आहे.

शिर्डीमध्ये पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले की, महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. पुढील दोन दिवसांत त्यावर अंतिम निर्णय होईल. तसेच मंत्रिमंडळ विस्तारही अंतिम टप्यात असून त्याबाबतीत लवकर माहिती देण्यात येईल. तीन पक्षांचे सरकार असल्याने सर्वाना समान न्याय मिळावा. तसेच सर्वांना काम करण्याची समान संधी असावी, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

आम्ही जरी घटक पक्ष वेगवेगळे असलो तरी राज्यघटनेवर आमचा पूर्ण विश्वास असून घटनेच्या तत्त्वाने पुढे जाणार आहे. पाच वर्षांचा कालखंड असल्याने मंत्रिपदासाठी घटक पक्ष एकत्र येत असताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो, असेही ते म्हणाले.

आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना मदत
राज्याच्या आजच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात येत असून त्यानंतर जास्तीत जास्त मदत राज्यातील शेतकऱ्यांना करण्याचा आमचा प्रामाणिक हेतू आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मला विरोधी पक्ष पदाची ऑफर मिळाली होती पण मी ती नाकारली. मात्र त्यावेळेस विरोधी पक्षनेतेपद घ्यायला हवे होते, आता त्याचा मला जास्त फायदा झाला असता, असे थोरात म्हणाले.

पक्ष सोडून जाणाऱ्यांना दु:ख होत असेल –
नेते पक्ष सोडून गेले त्याठिकाणी नवीन तरुणांनी ती जागा भरून काढली आणि पक्षाला विजय मिळवून दिला. जे सोडून गेले त्यांना आता दु:ख होत आहे, पश्चाताप झाला असून चुकल्यासारखे वाटत असल्याचे सांगून पक्ष सोडून गेलेल्या लोकांना पुन्हा संधी द्यायची ठरली तर ज्या तरुणांनी काम करून ती जागा भरून काढली आहे त्यांचा विचार घ्यावा लागेल.

संस्थानकडून सत्कार
मंत्री थोरात यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्यकार्यकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खा.सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, आमदार सुधीर तांबे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन चौगुले, माजी जिल्हाध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, अशोक खांबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप वर्पे, रमेश गोंदकर, महेंद्र शेळके, संदीप सोनवणे, सुधाकर शिंदे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 1:08 pm

Web Title: uddhav thackeray sharad pawar balasaheb thorat maharashtra government nck 90
Next Stories
1 कांद्याची भाववाढ; तीन महिन्यापूर्वीच केंद्राला इशारा दिला होता : शरद पवार
2 अल्पवयीन मुलीस डांबून ठेवून बलात्कार, हिंगोलीतून सुटका
3 ‘मी पुन्हा येईन’ या मागची भूमिका काय? फडणवीसांनीच केले स्पष्ट; पवारांनाही दिलं उत्तर
Just Now!
X