केडगावमधील शिवसैनिकांच्या हत्येवरून उद्धव ठाकरे यांची टीका

नगर : सध्याचे सरकार नाकर्ते आहे. मुख्यमंत्री विकासकामांत व्यग्र असल्याने त्यांना राज्यातील माता-भगिनींच्या आक्रोशाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. महाराष्ट्राचा बिहार झाला आहे, त्यामुळे गृहमंत्री स्वतंत्रच हवा, सत्तेसाठी भाजपने गुंडांना पाठीशी घालत वाल्यांना वाल्मीकी बनवू नये, सरकारचे नाकर्तेपण आणखी वाढले तर शिवसेनेला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. मुख्यमंत्री सहकारी मंत्र्यांवर, अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

केडगाव उपनगरातील पोटनिवडणुकीत संजय कोतकर व वसंत ठुबे या दोघा शिवसैनिकांची सात एप्रिलला हत्या करण्यात आली. या दोन कुटुंबीयांचे सांत्वन ठाकरे यांनी केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, जलसंपदामंत्री विजय शिवतारे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार विनायक राऊत, खा. सदाशिव लोखंडे, आमदार औटी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

केडगावमधील दुहेरी हत्या ही राज्यातील सत्ताधाऱ्यांना लाज आणणारी घटना आहे. छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेवर आलेले मोगलाई पोसत आहे. देशात आणि राज्यातही सध्या विचित्र वातावरण निर्माण झाले आहे. आमदार परिचारकपासून ते छिंदम अशांना घेऊन आणि गुंडांच्या आधारे सत्ता स्थापन केली जात असेल तर हेच का भाजपचे ‘अच्छे दिन?’ अशी टीका ठाकरे यांनी केली. गृहमंत्रिपद स्वतंत्रच हवे, याचा पुनरुच्चार करून ठाकरे म्हणाले, की मुख्यमंत्री विकासकामात व्यग्र असल्याने त्यांना राज्यातील माता-भगिनींचा आक्रोश दिसत नाही, तपास यंत्रणाही दबावाखाली आहे. एसपी कार्यालयावर हल्ला करणारे आमदार कर्डिले जामिनावर सुटले आहेत. पूर्वी आपण राज्याचा बिहार झाला का, असे म्हणायचो, परंतु आता नीतिशकुमारांनी महाराष्ट्रापेक्षा बिहार चांगला केला आहे.

हत्या करणारे मारेकरी, त्याचा सूत्रधार, सुपारी देणारे, सत्ताधारी पक्षातील असले तरी त्यांना फासावर लटकवलेच पाहिजे. या खटल्यात वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी आपण त्यांना फोन केला आहे. हत्या झालेल्या कुटुंबाला शिवसेना वाऱ्यावर सोडणार नाही. या खटल्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करा, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

..त्यांनी आम्हाला सांगू नये

मग नाकर्त्यां सरकारमध्ये का राहता, या प्रश्नावर उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले होते. ते म्हणाले, हा पेरलेला प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. पेरते व्हा, म्हणत पत्रकारांना हा प्रश्न विचारायला लावला जातो. ज्यांना लोकांनी लाथ मारून सत्तेतून बाहेर काढले, त्यांनी तर आम्हाला अजिबात सांगू नये. नंतर ठाकरे यांनी प्रश्नकर्त्यांला, ‘हे व्यक्तिगत घेऊ नका’, असे स्पष्ट केले.

आम्ही कोणावर हात उचलत नाही, परंतु उचललेला हात उखडून टाकतो. केडगावातील गुंडागर्दी सेना मोडून व ठेचून काढेल. मग कायदा हातात घेतला म्हणून आम्हाला दोष देऊ नका. – उद्धव ठाकरे

गेली चार वर्षे उद्धव असेच बरळत आहेत. त्यामुळे त्यांचे वक्तव्य फारसे गांभीर्याने घेण्याचे कारण नाही. – माधव भांडारी, भाजप प्रवक्ते

मंत्र्यांचे अधिकार

सहकारी मंत्र्यांच्या अधिकारावर मुख्यमंत्री प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत, असा आरोप करून शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. आमच्या गृहराज्यमंत्र्यांनी अधिकार वापरलेला त्यांना चालत नाही, त्यावर ते पश्न उपस्थित करतात. पण आमच्या मंत्र्यांनी अधिकार दाखवायला सुरुवात केली तर ते त्यांना चालतील का, याचे उत्तर त्यांनी द्यावे. आमच्या मंत्र्यांनी अधिकार वापरले तर नंतर तक्रार करू नका, असेही ठाकरे म्हणाले.

अप्रत्यक्ष कबुली

केडगावमधील दगडफेक प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही शिवसैनिकांना अटक झालेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या वर्षां बंगल्यावर आंदोलनाचा इशारा देऊन दबाव टाकला जात आहे का, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, आम्ही कोणता मार्ग स्वीकारायचा याबद्दल कोणी आम्हाला शिकवू नये. सरकार ऐकत नाही का, या प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना अद्याप कोणाला अटक झालेली नाही, हेही स्पष्ट करत अप्रत्यक्ष कबुलीही दिली.