News Flash

भाजपाने कोणतेही आदर्श निर्माण न करता तयार आदर्शांवर आपला शिक्का मारलाय; उद्धव ठाकरेंचा टोला

सावरकरांच्या मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंनी भाजपावर साधला निशाणा

(फोटो सौजन्य: स्क्रीनशॉर्ट, Twitter@MEAIndia आणि पीटीआयवरुन साभार)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणासंदर्भात आभार व्यक्त करणारं भाषण दिलं. या भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी वीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन टीका करणाऱ्यांनाही उत्तर दिलं. सावरकरांना भारतरत्न देण्याचा निर्णय कोण घेतं असा प्रश्न विरोधकांना विचारत उद्धव यांनी केंद्र सरकारने सावरकरांना भारतरत्न दिलेला नाही असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोनदा यासंदर्भात पत्र पाठवण्यात आली होती अशी आठवणही उद्धव यांनी करुन दिली. तसेच पुढे बोलताना भाजपाला एकही आदर्श तयार करता आला नसून जे तयार आदर्श आहेत त्यांच्यावर आपले शिक्के मारण्याचं काम सुरु आहे अशी टीका उद्धव यांनी केली.

“तुमचा आमचा आणखीन एक आवडता विषय म्हणजे सावरकर,” असं म्हणत उद्धव यांनी सावरकरांच्या विषयावरुन होणाऱ्या टीकेसंदर्भातील विषयाला हात घातला. “सावरकरांना भारतरत्न द्या हे पत्र दोन वेळाला गेलं आहे. देवेंद्रजी आपण मुख्यमंत्री होता. २०/८/२०१८ आणि १७/१/२०१९ या दोन तारखांना सावकरांना भारतरत्न देण्यासंदर्भातील शिफारस पत्र सरकारकडून पाठवण्यात आलं आहे. कोण देतं हो भारतरत्न? आपली काही आमदरांची कमिटी आहे का? राज्यातील आमदारांची कमिटी आहे का ठरवायला की भारतरत्न कोणाला त्यायचं? भारतरत्न देण्याचा अधिकार देशाच्या पंतप्रधानांना आणि केंद्रीय समितीला आहे. का दिलं जात नाही हो सावरकरांना भारतरत्न?,” असा प्रश्न त्यांनी विरोधी पक्षाच्या बाकांवर बसलेल्या नेत्यांकडे पाहून विचारला.

पुढे बोलताना उद्धव यांनी, “सर्वच तुम्हाला पाहिजेत. वल्लभभाई आमचे, सावरकर आमचे. गांधीजी आमचे. हे आमचे… ते आमचे. तुम्ही निर्माण काहीच केलं नाही. तुम्ही कोणते आदर्श निर्माण केले नाहीत. पण जे तयार आदर्श आहेत ते घ्यायचे आणि त्याच्यावर आपला शिक्का मारायचा,” असा टोला भाजपाला लगावला.

याच मुद्द्यावरुन उद्धव यांनी गुजरातमधील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमसंदर्भातही भाष्य केलं. “मला कोणीतरी सांगितलं की आपला देश क्रिकेटचा प्रत्येक सामना जिंकल्याशिवाय राहणार नाही. का तर स्टेडियमचं नाव बदललं आहे. त्या स्टेडिमला नाव दिल्यानंतर आपण तिथे सामना हरु शकत नाही असं त्या स्टेडियमचं नाव आहे. वल्लभभाईंचं नाव पुसून टाकता. सावरकरांना भारतरत्न देत नाही आणि आम्हाला शिकवता संभाजी नगर करा?, आम्ही करु ना संभाजीनगर जरुर करु. त्याच्या आधी मला ही पण तारीख हवी की याच विधानसभेमध्ये आपण संभाजीनगर विमानतळाचं नामकरण केलं आहे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ. पण कोणाच्या दारी ते अडून ठेवलं आहे?,” असा प्रश्न विचारत उद्धव यांनी पुन्हा नामकरणाला केंद्राचा हिरवा कंदील मिळालेला नसल्याचं सूचित केलं. ठछत्रपती शिवाजी महाराज्यांच्या सुपुत्राचं नाव विमानतळाला देत नाही आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता?,” असा प्रश्नही उद्धव यांनी भाजपाला विचारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 5:45 pm

Web Title: uddhav thackeray slams bjp over veer savarkar issue scsg 91
Next Stories
1 भाजपाला भारतमाता की जय बोलण्याचा अधिकार नाही; RSSचा हवाला देत ठाकरेंची टीका
2 ‘पुन्हा येईन… पुन्हा येईन’ म्हणत करोनाही आला; उद्धव ठाकरेंची फडणवीसांना कोपरखळी
3 “मराठी भिकारी आहे का?, महाराष्ट्र भिकारी आहे का?, आम्ही काय…”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत संतापले
Just Now!
X