कर्नाटकमधील मराठी भाषिकांचा भूभाग पूर्णपणे महाराष्ट्राचा आहे. तो महाराष्ट्राशी जोडल्याशिवाय शांत बसणार नाही अशी गर्जनाच आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दौऱ्याची सुरुवात करताना महाराष्ट्रातील सीमेवर चंदगड तालुक्यातील शिनोळी येथील सीमा भागातील जनता आणि शेतकरी यांच्याशी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. ‘बेळगाव आमच्या हक्काचे, उद्धव ठाकरे आप आगे बढो’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

शुक्रवारच्या दौऱ्यादरम्यान शिनोळी ग्राम पंचायत क्षेत्रात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणही केले. शिवसेना कायमच मराठी भाषिकांच्या सोबत राहिल असेल असेही आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. कर्नाटकातील मराठी भाषिकांचा भूभाग हा महाराष्ट्राचाच आहे. मराठी बांधवांचा भूभाग महाराष्ट्रात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही असे वचनही उद्धव ठाकरे यांनी दिले.

सीमा या देशाला असतात मराठी माणसाच्या हक्काला नाही. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे शिवसेनेचे वचन आहे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. सीमा भागातील मराठी माणसांच्या वेदना समजून घेण्यासाठी शिवसेनेचे मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कायम तुमच्या संपर्कात असतील आणि तुमच्या लढ्यात सहभागी होतील असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष टी. के. पाटील, बेळगावच्या महापौर संज्योत बांदेकर, माजी महापौर सरिता पाटील, किरण सायनाक, नगरसेवक पंढरी परब, रतन मासेकर, विजय भोसले, यांनी शिनोळी येथे उद्धव ठाकरेंचे स्वागत केले. तर मध्यवर्ती एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी ,माजी आमदार मनोहर किणेकर , मालोजी अष्टेकर आदींनी बेळगाव विमानतळावर ठाकरे यांचे स्वागत केले .