उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज बैठक; भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक

नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी राज्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले  आहे. पालघरमध्ये शिवसेनेने भाजप विरोधात उमेदवार देऊन पुढील निवडणुकांमध्ये एकला चालोरेचा संदेश दिला असला तरी भंडारा-गोंदिया मतदारसंघात मात्र उमेदवार दिला नाही. त्यामुळे याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होऊ शकतो. दरम्यान, शुक्रवारी उद्धव ठाकरे नागपुरात असून ते या मतदारसंघात पक्ष कोणती भूमिका घेणार, याबाबत निर्णय घेणार आहेत.

Modi, religious polarization, Marathwada,
‘रजाकारी’ला उजाळा देत मराठवाड्यात मोदींचा धार्मिक ध्रुवीकरणावर भर
Ajit Pawar gave a public confession Said Hooliganism in the industrial area
अजित पवारांनी दिली जाहीर कबुली; म्हणाले, ‘औद्योगिक पट्ट्यात गुंडगिरी…’
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ

मुंबई-ठाणे-कोकण हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असून त्याला मधल्या काळात भाजपमुळे तडे दिले. त्यामुळे शिवसेनेने भाजपच्या बालेकिल्ल्यात म्हणजे विदर्भात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबई-पुण्याच्या तुलनेत येथे शिवसेनेची ताकद कमी असली तर अगदीच नगण्य नाही. पालघरइतकीच भंडारा-गोंदियाची जागा भाजपसाठीच नव्हे तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. २०१४ मध्ये भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवून ती जिंकणारे नाना पटोले यांचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मतभेद झाल्याने त्यांनी पक्ष सोडला. मात्र ही कृती करताना त्यांनी फडणवीस यांनाही लक्ष्य केले होते. त्यामुळे ही जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच, अशी भाजपची व्यूहनीती आहे. यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व शक्ती पणाला लावणार आहेत. अशा अटीतटीच्या स्थितीत त्यांना शिवसेनेची गरज आहे. मात्र सेनेने अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा प्रभाव आहे. १९९५ आणि १९९९ या विधासभेच्या निवडणुकीत गोंदियातून रमेश कुथे विजयी झाले होते. २००९ मध्ये भंडारा येथून सेनेचे नरेंद्र भोंडकर विजयी झाले होते. पवनी आणि गोंदिया पालिकेत अनेक वर्षे पक्षाची सत्ता होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही सेनेचे प्रतिनिधित्व होते आणि आहे. गावागावात सेनेच्या शाखा आहे. पक्षाने ही पोटनिवडणूक लढवावी अशी सामान्य शिवसैनिकांची इच्छा होती. देवराव बानवकर यांनी उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे शिवसेनेचा एक गट नाराज आहे. दुसरीकडे शिवसेना रिंगणात असती तर या मतदारसंघातील शिवसैनिक कामाला लागले असते. उमेदवारच नसल्याने त्यांच्यात नैराश्य येण्याची शक्यता आहे व असे झाले तर याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ११ मे रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपूरला येत आहेत. त्यांनी येथील रविभवनात विदर्भातील पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांचाही समावेश असून या बैठकीत उद्धव ठाकरे भंडारा-गोंदियाबाबत स्पष्ट भूमिका मांडतील व त्यानंतरच कार्यकर्ते त्यांना दिलेल्या आदेशानुसार कामाला सुरुवात करतील, असे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शुक्रवारची बैठक महत्त्वाची मानली जाते.

उमेदवार न देणे भाजपच्या पथ्यावर

या मतदारसंघात शिवसेनेकडून देवराव बावनकर यांनी अर्ज भरला होता. मात्र त्यांना पक्षाने शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे ते अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. यामुळे पक्षातील एक गट नाराजही झाला आहे. शुक्रवारी होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला हा गट उपस्थित राहण्याची शक्यता नाही.

..तर भाजप पराभूत झाला असता

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची एक ते दीड लाखाची ‘व्होट बँक’ आहे. पक्षाने उमेदवार दिला असता तर निश्चितपणे इतकी मते सेनेच्या उमेदवाराने घेतली असती व त्याचा फटका भाजपला बसला असता.

– नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार, शिवसेना


पक्षाच्या आदेशाची वाट

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ११ तारखेला नागपूर येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यात ते भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाबाबत पक्षाची कोणती भूमिका असेल, याबाबत आदेश देणार आहे. पक्षाने दिलेल्या सूचनेनुसार पुढील धोरण ठरवले जाईल.

– राजेंद्र पटले, जिल्हा प्रमुख, भंडारा