News Flash

विदर्भ माझ्या हृदयात, अन्याय होऊ देणार नाही..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या साठाव्या वर्षांत वैदर्भीयांसाठी नागपुरात विधिमंडळ सचिवालयाचे कायमस्वरूपी कार्यालय सुरू होणे हा शुभसंकेत आहे. विदर्भ आमच्या हृदयात आहे, त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही व तो करणाऱ्यांविरुद्ध आम्ही ढाल बनून उभे राहू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

विधिमंडळ सचिवालयाच्या नागपूर कार्यालयाच्या सोमवारी आयोजित उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ते मुंबईहून या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.

व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार होते.

या कार्यक्रमात मुंबईहून ऑनलाईन सहभागी होणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही समावेश होता.

विधानभवनातील जुन्या इमारतीत हे कार्यालय सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन पटोले यांच्या हस्ते झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, हे कार्यालय अधिक सक्षमपणे चालावे म्हणून तेथे सक्षम अधिकारी नेमावेत. लोकशाहीत संसदीय प्रणालीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते कमी करण्याचा कोणी प्रयत्न केला तर खपवून घेणार नाही.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अध्यक्ष, सभापतींनी महिन्यातून एक वेळ नागपूरमध्ये येऊन बैठक घ्यावी, अशी सूचना केली.

विधिमंडळ सचिवालयाचे पुण्यातही कार्यालय

नागपूर प्रमाणेच पुण्यातही विधिमंडळ सचिवालयाचे कार्यालय लवकरच सुरू केले जाईल, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. या कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे सहभागी झाल्या होत्या. त्यांनी त्यांच्या भाषणात नागपूर प्रमाणेच पुण्यातही विधानभवन आहे. त्यामुळे तेथेही विधिंमंडळ सचिवालयाचे कार्यालय सुरू करावे,अशी मागणी केली होती. पटोले यांनी त्यांच्या भाषणात नीलम गोऱ्हे यांच्या मागणीची दखल घेत पुण्यातही हे कार्यालय लवकरच सुरू होईल, असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 2:28 am

Web Title: uddhav thackeray vidarbha mppg 94
Next Stories
1 सिंचन प्रकल्पांची गती मंदावली
2 रायगडमध्ये अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ
3 मानसिक आजारांवरील उपचारासाठी प्रशासनाची मदत
Just Now!
X