बहुजन विकास आघाडीतर्फे दोन वेळा बोईसरच्या आमदारपदी निवडून आलेले आमदार विलास तरे यांनी शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे.

२००४ मध्ये शिवसेनेतून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेलेल्या विलास तरे यांनी २००९ मध्ये पुनर्गठित झालेल्या बोईसर विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीमधून विधानसभा निवडणूक लढवून विजयी झाले होते. त्याचप्रमाणे २०१४ मध्ये त्यांनी याच पक्षाकडून पुन्हा आमदारकी मिळवली होती.

गेल्या वर्षभरापासून बहुजन विकास आघाडीच्या एकंदर कार्यपद्धतीवर विलास तरे काहीसे नाराज दिसत होते. तसेच त्यांनी बहुजन विकास आघाडीकडून खासदारकी लढवण्यास नकार दिला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विलास तरे भाजप किंवा शिवसेना या दोनपैकी एका पक्षात पक्षांतर करतील अशी चर्चा होती.

विलास तरे यांचे स्वगृही स्वागत करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. तरीदेखील सत्तेच्या लालसेपोटी बहुजन विकास आघाडीमध्ये दहा वर्षे असलेल्या विद्यमान आमदारांना शिवसेनेत घेतल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करून याबाबत नाराजी दर्शविली आहे.

बोईसर विधानसभेच्या जागेसाठी भाजप व शिवसेनेकडून अनेक इच्छुक असताना विलास तरे यांच्या शिवसेना पुनरागमनामुळे शिवसेनेच्या तिकिटाबाबतची अनिश्चितता संपली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पक्षांतर करताना बोईसर विधानसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली नसल्याचा खुलासा शिवसेना पक्ष प्रमुखांनी केला. तर कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपण पक्षांतर केल्याचे विलास तरे यांनी प्रवेश घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी विलास तरे यांनी आपल्या आमदारपदाचा राजीनामा सुपूर्द केला. याबाबत बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांना प्रतिक्रिया विचारली असता ‘देव त्यांचे भले करो’ असे सांगितले.