News Flash

कर्जमुक्ती न झाल्यास लढाई!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नी टोकाची भूमिका घेऊ असे येथे स्पष्ट केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नी टोकाची भूमिका घेऊ असे येथे स्पष्ट केले.

सत्तेसाठी मवाळ सेनेची शेतकरीप्रश्नी टोकाची भाषा; ‘मी कर्जमुक्त होणार’ आंदोलनाचे सूतोवाच

सरकारला इशारा

सत्तेतून बाहेर पडण्याच्या प्रश्नावर काहीशी मवाळ भूमिका घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नी टोकाची भूमिका घेऊ असे येथे स्पष्ट केले. आधी कर्जमुक्ती व्हायला हवी, नाहीतर लढाई अटळ असल्याचा इशारा उद्धव यांनी सरकारला दिला आहे.  येत्या काळात शिवसेना ‘मी कर्जमुक्त होणार’ असे आंदोलन हाती घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार बैठकीमध्ये सांगितले. सत्तेत राहूनच शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक राज्यपाल पदावर असतील तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशाचे सर्वोच्च पद स्वीकारण्यास काय हरकत आहे, असे म्हणत राष्ट्रपतिपदासाठी त्यांना पाठिंबा असल्याच्या विधानाचा पुनरुच्चार केला.

मराठवाडय़ातील शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी मुंबईच्या नगरसेवकांसह मराठवाडय़ातील आमदारांना त्यांनी दोन दिवस ४६ मतदारसंघांचा दौरा करण्याच्या सूचना केल्या होत्या. सरकारच्या विविध योजनांवर नागरिकांचे मत घेण्यासाठी एक विवरणपत्रही देण्यात आले होते. तसेच कोणत्या जिल्हय़ात संघटनेची स्थिती काय आहे, याचा आढावा त्यांनी घेतला. या वेळी औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खरे उपस्थित होते. राज्यामध्ये यात्रांचे पेव फुटले आहे, त्यातील शिवसंपर्क हा प्रकार नसल्याचे सांगत त्यांनी संघटनात्मक बांधणीसाठीतील उणेदुणे कळावे, म्हणून ही योजना असल्याचे सांगितले. तत्पूर्वी त्यांनी मराठवाडय़ातील आठही जिल्हय़ातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सरकारी योजनांविषयी जनतेचे काय मत आहे, हे जाणून घेता यावे म्हणून पदाधिकाऱ्यांना एक विवरणपत्र भरण्यासाठी दिले होते. त्याचबरोबर निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणीही करण्यासही सांगण्यात आले होते. मतदारसंघनिहाय अहवाल त्यांनी घेतला. या पाश्र्वभूमीवर पत्रकार बैठकीमध्ये ही  मध्यावधी निवडणुकांची तयारी समजायची का, असा प्रश्न विचारला असता संघटनात्मक बांधणीला निवडणुकीची आवश्यकता नसते, असे उत्तर त्यांनी दिले.

सत्तेत राहूनच इशारा देण्याची शिवसेनेची जणू कार्यपद्धती वाटावी, असे वक्तव्य करीत उद्धव ठाकरे यांनी तूर प्रश्नी सरकारने शेतकऱ्यांकडील सर्व तूर खरेदी करावी, असेही सांगितले. कर्जमुक्तीची मागणी करत विरोधकांची यात्रा सवंग असल्याची टीका करतानाच त्यांनी शिवसेनेच्या कर्जमुक्तीच्या पाठिंब्याला उचलून धरलाबद्दल धन्यवादही दिले.

राष्ट्रपतिपदी मोहन भागवत यांनी बसण्यात काहीच गर नसल्याचे सांगत अन्य प्रचारक आणि स्वयंसेवक राज्यपालपदी नियुक्त झालेले आहेत. तेव्हा त्यांनी भारताचे सर्वोच्च पद स्वीकारणे वावगे ठरणार नसल्याचे सांगितले. मात्र, मराठी माणूस म्हणून शरद पवार यांना पाठिंबा असेल की नाही, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले. जीएसटी लागू करताना सर्व शहरांना एकाच तराजूमध्ये तोलू नका, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला.

* ‘कर्जमुक्तीच्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी दोन निवेदन आलेली आहेत. ७-८ वर्षांपूर्वी याच प्रश्नी ‘ देता की जाता’ असे आंदोलन छेडल्याने काँग्रेस सरकाने थातूर-मातूर कर्जमाफी केल्याचे सांगत सत्ता बदल झाल्याने अपेक्षा वाढल्या आहेत.

* त्या सरकारने पूर्ण कराव्यात अशी आमची मागणी आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी दोन निवेदने विधिमंडळात दिली आहेत. ते एक प्रकारचे वचन असल्याचे सांगत या प्रश्नी शिवसेनेची मागणी कायम असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

* मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आम्ही थांबलो होतो. आता हंगाम येतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांना घेऊन काही हालचाल करावी लागेल.

* ज्या सत्तेत आम्ही आहोत त्या सत्तेकडून न्याय मिळतो की नाही हे पाहावे लागले. त्यासाठी टोकाची पाऊले उचलावी लागतील. नाहीच झाले तर मग आहेच लढाई’ या शब्दात त्यांनी सरकारला इशारा दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 1:22 am

Web Title: uddhav thackeray warn government to waive off farmers loans
Next Stories
1 दाभाडीचे शेतकरी दिल्लीत धडकणार
2 वरच्या मजल्यावर दानवे, खाली लोणीकर
3 तीव्र उन्हात नेत्यांची लग्न समारंभासाठी दमछाक!
Just Now!
X