मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांसाठी आपणच मुख्यमंत्री असू असं म्हटल्यावर साहजिकच शिवसेनेची भूमिका काय याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. ही भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे. शिवसेनेच्या वतीने जी काही भूमिका आहे ती उद्धव ठाकरे घेतील, उद्धव ठाकरेच याबाबत बोलतील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत काही ठरलेलं नव्हतं असंही मुख्यमंत्री म्हटले. मात्र आम्ही जे ठरलं आहे त्यापेक्षा जास्त काहीही मागत नाही असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री मीच होणार असं जे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत त्याबाबत काय सांगाल? असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, ” देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १४५ जागा असतील तर त्यांना कोण रोखणार? उद्या खडसे आले आणि म्हणाले माझ्याकडे १४५ लोक आहेत त्यांना कोण रोखणार? माझ्याकडे १४५ लोक असतील मला कोण रोखणार? शरद पवार १४५ जागा घेऊन आले त्यांना कोण रोखणार? ज्यांच्याकडे एकने जास्त आमदार असेल तो मुख्यमंत्री होईल सरकार बनवेल. एक मताने वाजपेयींचं सरकार पडलं होतं त्यामुळे राजकारणात एक हा अंक खूप महत्त्वाचा आहे.”

” आम्ही कोणतीही चुकीची मागणी करत नाही, लोकसभेच्या वेळी जो फॉर्म्युला ठरला त्यानुसारच आमची मागणी आहे. जनतेचा निर्णय जनतेने दिला आहे. आमची समजूत वगैरे काढण्याची गरज नाही, आम्ही काही हट्टाला पेटलेले नाही. सामनामधूनही मी पक्षाचीच भूमिका मांडतो आहे. आमचं जे ठरलं होतं ते सोडून आम्ही वेगळं काय मागतो आहोत? ” असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालात भाजपा आणि शिवसेनेला जनतेने कौल दिला. आता मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेने अर्धा हक्क सांगितला आहे. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं असं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी मीच मुख्यमंत्री होणार आहे असं म्हटलं होतं. आता यावर जी काही भूमिका घ्यायची आहे ती उद्धव ठाकरेच घेतील असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.