महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार यशस्वी पद्धतीने सुरु आहे. हा एक वेगळा प्रयोग झाला आहे. तरीही मुख्यमंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसला झुकतं माप देतात असा एक आरोप काँग्रेसकडून होतो. या प्रश्नाला दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी सामनाच्या मुलाखतीत उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीला झुकतं माप देतो म्हणजे काय करतो हे तरी सांगा असा प्रतिप्रश्नही त्यांनी संजय राऊत यांना विचारला आणि त्यानंतर या प्रश्नाचं उत्तरही दिलं.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
” राष्ट्रवादीला झुकतं माप दिलं जातं हा एक प्रेमळ आक्षेप काँग्रेसने सुरुवातीला घेतला होता. मात्र त्यात फारशी काही तीव्रता नव्हती. सुरुवातीला त्यांना असं वाटलं होतं. मात्र मी त्यांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर त्यांचा हा गैरसमज दूर झाला. शेवटी असं आहे की सगळेजण निवडणूक लढवून निवडून येत असतात. जनतेच्या काही अपेक्षा त्यांच्याकडून असतात म्हणून तर जनता मतं देते. त्या अपेक्षा आपण पूर्ण करु शकत नसू असं कुणाला वाटत असेल तर ती त्यांची चूक नाही. त्या आशा-अपेक्षा व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही. मी याला काही आक्षेप असं नाव देणार नाही. मात्र सुरुवातीच्या काळात त्यांच्या मनात असं काही असेलही.. मला त्यांनी तसं ठामपणे सांगितलं नाही. माझं पवारसाहेबांशीही चांगलं पटतं, नित्य नियमाने नाही पण सोनियाजींनाही मी फोन करत असतो.”

शरद पवारांचं मार्गदर्शन मिळतंच

शरद पवारांसोबत जेव्हा माझी भेट होते तेव्हा ते कोणतीही मागणी घेऊन माझ्याकडे आलेले नसतात. ते मुख्यमंत्री असतानाचे त्यांचे अनुभव, लातूरचा भूकंप आला होता तेव्हा त्यांनी परिस्थिती कशी हाताळली होती? ते परराष्ट्र मंत्री असताना चीनच्या पंतप्रधानांना भेटले होते तेव्हा त्यांना आलेले अनुभव, या सगळ्या विषयांवर आमची चर्चा होते. त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत असतंच असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.