उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांमध्ये विषारी दारु प्यायल्यामुळे १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. त्याच मुद्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपावर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशात सरकारी रुग्णालयांना ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा वेळेत न केल्यामुळे असंख्य बालकांचा तडफडून अंत झाला आणि आता विषारी दारूने सवाशे बळी घेतले. एवढे होऊनही ‘हेच आमचे सुशासन’ असे गोडवे हे लोक गात असतात. देशभरातील अनेक उद्योग बंद पडत असताना ‘दारूकामा’चा हा जीवघेणा धंदा मात्र भलताच तेजीत सुरू आहे. तो रोखण्याचा ‘जोश’ निवडणूक वर्षात सरकार दाखविणार आहे काय? असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात

– उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांतून येणाऱ्या दारूकांडाच्या बळींच्या बातम्या मन सुन्न करणाऱ्या आहेत. विषारी दारू प्यायल्यामुळे चार दिवसांपासून या दोन्ही राज्यांत किडय़ामुंग्यांसारखे मरण यावे अशा पद्धतीने लोक मृत्युमुखी पडत आहेत. गुरुवारपासून मृत्यूचा हा सिलसिला सुरू आहे व तो थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पहिल्या दिवशी विषारी दारूसेवनाची बातमी समोर आली तेव्हा काही तासांतच बळींचा आकडा 25 वर गेला आणि गेल्या चार दिवसांत तर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 125 हून अधिक झाली आहे. खासकरून उत्तर प्रदेशातील सहारनपूर आणि कुशीनगर या दोन जिह्यांत विषारी दारूकांडाने हाहाकार उडवला आहे.

– उत्तराखंडमधील हरिद्वार हे पवित्र तीर्थक्षेत्र ‘देवभूमी’ म्हणून ओळखले जाते. मात्र, तिथेही चार दिवसांपासून विषारी दारूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. ज्या ज्या गावांत ही दारू पोहोचली, त्या प्रत्येक गावात मृत्यूचे थैमान सुरू आहे. ज्या छोटय़ा-मोठय़ा विक्रेत्यांनी ही दारू विकली, त्यांनीही या दारूचे सेवन केले आणि तेही संपले. दारूकांडात मृत्युमुखी पडलेले सर्वच जण गरीब कुटुंबातील आहेत. छोटी छोटी कामे करणारे कष्टकरी आहेत. दिवसभर राबायचे, काबाडकष्ट करायचे, त्या दिवसापुरते कमवायचे आणि आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा. कष्टाचे काम केल्यानंतर थकवा घालविण्यासाठी म्हणा किंवा विरंगुळा म्हणून स्वस्तातली हातभट्टीची दारू प्यायची हा जणू या मजूरवर्गाचा रिवाजच.

– मात्र, थकलेल्या देहाला चटकन झोप लागावी म्हणून घेतलेली ही दारू विषारी आहे आणि प्यायल्यानंतर लागलेली झोप ही ‘काळझोप’ ठरेल हे त्या जिवांना काय ठाऊक असणार? दारूकांडात जीव गमावून बसलेले कुटुंबातील कर्ते आणि कमावते पुरुष होते, तो कुटुंबप्रमुखच सवाशे कुटुंबांनी गमावला. घरातील मुख्य माणूस असा डोळ्यांसमोर तडफडून गेल्याचे दुःख मोठे आहेच, पण दुःख आणि आकांताचे चार दिवस सरल्यावर आता खायचे काय? हा या कुटुंबांसमोर मोठा प्रश्न आहे. हे वास्तव भयंकर आणि दाहक आहे. दारूचा अवैध व्यापार करणाऱ्या, मृत्यूचा नंगानाच घडविणाऱ्या मद्यविक्रेत्यांना आणि त्यांच्याशी संगनमत असणाऱ्या पोलीस व सरकारी अधिकाऱ्यांना आज या कुटुंबांपुढे वाढून ठेवलेल्या भीषण परिस्थितीची जाणीव आहे काय? गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडेच गावठी दारूचा सुळसुळाट उघडय़ा डोळ्यांनी दिसत असताना हप्तेखोर अधिकारी बेकायदा दारूविक्रीच्या व्यवसायाला संरक्षण देतात हे काही आता लपून राहिलेले नाही.

– अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि दारूच्या बडय़ा पुरवठादारांच्या बंगल्यांवर गावठी दारूच्या व्यवसायातून सोन्याची कौले चढत असली तरी सर्वसामान्य गोरगरीब लोक ही रसायनमिश्रित विषारी दारू पिऊन उद्ध्वस्त होत आहेत याची चाड कोणालाच राहिली नाही. गरीबांचे मृत्यू हा खरे तर राजकारणाचा विषय होता कामा नये. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दारूकांडामागे समाजवादी पार्टीचा हात असू शकतो असे पोरकट विधान केले आहे. वास्तविक उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. पुन्हा ही विषारी दारू तिथे विकली जात असताना हेच योगी महाशय पश्चिम बंगालमधील सभेत भाजपसाठी मते मागत होते.

– यापूर्वी उत्तर प्रदेशात सरकारी रुग्णालयांना ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा वेळेत न केल्यामुळे असंख्य बालकांचा तडफडून अंत झाला आणि आता विषारी दारूने सवाशे बळी घेतले. एवढे होऊनही ‘हेच आमचे सुशासन’ असे गोडवे हे लोक गात असतात. हातभट्टी आणि गावठी दारूचे अड्डे म्हणजे गोरगरीबांच्या मृत्यूचे सौदागरच आहेत हे वारंवार सिद्ध होऊनही आपल्या देशातील गावठी दारूचा बाजार आजवर कोणालाही थोपवता आला नाही. उलट सामान्य जनतेला उद्ध्वस्त करणारा हा स्वस्तातला दारूबाजार दिवसेंदिवस नावारूपाला येत आहे. देशभरातील अनेक उद्योग बंद पडत असताना, आर्थिक मंदीमुळे व्यापारउदिम रसातळाला जात असताना ‘दारूकामा’चा हा जीवघेणा धंदा मात्र भलताच तेजीत सुरू आहे. तो रोखण्याचा ‘जोश’ निवडणूक वर्षात सरकार दाखविणार आहे काय?