गाई मारणं जसं पाप आहे तसंच थापा मारणं पण पाप आहे, असं सांगत थापा मारण्यावर पण बंदी घालायला हवी असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारला आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ते बोलत होते. भारतीय जनता पार्टीवर विशेषत: टीका करताना त्यांनी नरेंद्र मोदी, नितिन गडकरी आदींना लक्ष्य केले.

नरेंद्र मोदींच्या 56 इंचीच्या छातीच्या त्या वक्तव्याच्या संदर्भ देत त्यांनी, पाकिस्तानच्या कुरापतींचा उल्लेख करत कुठे गेली ती 56 इंची छाती असा सवाल केला. काश्मिरमध्ये दहशतवादी मारणार म्हणजे मारणारच असं ता सांगत नाही असं विचारत कुठे गेलं तुमचं हिंदुत्व असा सवाल त्यांनी मोदी व भाजपाला केला आहे. मोदी हे थापा मारून सत्तेवर आल्याचा आरोप करत गाईला मारण्याप्रमाणेच थापा मारणंही पाप असल्याचं ठाकरे म्हणाले. पुढे जात थापा बंदी करायला हवी असं सांगतानाच, सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण कुणापुढे सोपवावं यावरूनही वाद होतील अशी कोपरखळीही ठाकरे यांनी मारली.

नितिन गडकरी यांनी भारतीय सैन्याचा अपमान केल्याची टीका करतानाच तुमचं शौर्य सीमेवर दाखवा अशी आव्हानाची भाषाही त्यांनी केली आहे. हिंदुत्व तसेच मराठी मुद्दा हे दोन्ही आमचे जिव्हाळ्याचे विषय आजही असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कानडी वक्तव्यावरही टीका केली. कानडी मातेच्या पोटी दत्तक जा असा सल्ला देत पाटील यांनी महाराष्ट्रात राहू नये कर्नाटकात जावं असं सांगितलं. कानडीचा अनादर नाही परंतु मराठीचा मान राखला जायलाच हवं असं ठाकरे यांनी सांगितलं.
मोदीही प्रत्येकवेळी बाहेरच्या पंतप्रधानांना अहमदाबादमध्येच का घेऊन जातात, ही प्रांतीयता नाही परंतु आम्ही मराठी म्हटलं की ती प्रांतीयता असं का असा सवालही त्यांनी विचारला.