सरकार प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलत आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे पंतप्रधांनांना पत्र लिहतील असा पुणेरी टोमणा चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. त्याचसोबत मराठा आरक्षण, फडणवीस-पवार भेट अशा मुद्द्यांवर चर्चाही केली.

फडणवीस-पवार भेटीबद्दल पाटील म्हणाले, शरद पवारांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्याने देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया ताईंना विनंती केली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.

आणखी वाचा – मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी यावेळी भाष्य केलं. महाविकास आघाडीला वाटतं की जनता मूर्ख आहे असंही ते यावेळी म्हणाले. गेल्या दीड वर्षांपासून राज्यात मागास आयोग नाही. त्यामुळे इथं केंद्राचा काहीही संबंध नाही. पण हे सरकार कोडगं आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगी बघायची असेल तेव्हाही उद्धव ठाकरे पंतप्रधानांना पत्र लिहतील, तुमच्या बघण्यातली दिल्लीतली कोण असेल तर सांगा म्हणून, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

आणखी वाचा – शरद पवार – फडणवीस भेटीवर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजी राजेंनी राजीनामा देण्याचीही तयारी वर्तवली आहे. त्याविषयी विचारणा केली असता पाटील म्हणाले, संभाजी राजेंनी राजीनामा देऊन काय साध्य होणार आहे हे माझ्या लक्षात येत नाही. तर सरकार हेरगिरी कऱत असल्याविषयीच्या संभाजीराजेंच्या ट्विटवरुन ते म्हणाले, संभाजीराजेंनी ते ट्विट केलं, मात्र पुन्हा काही वेळाने आपण गृहमंत्र्यांशी याविषयी चर्चा केल्याचं सांगत दुसरं ट्विट केलं…एवढं बोलून त्यांनी पत्रकार परिषदेची सांगता केली.