शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कुडाळ येथे येत्या २८ एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेच्या या मेळाव्यात लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाव घोषित होईल, असे शिवसैनिकांत बोलले जात आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना मेळाव्यात शिवसेना बळकटीसाठी पक्षप्रवेशही दिला जाणार आहे. त्यासाठी काही राजकीय मंडळी शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यांची नावे सध्या चर्चेत असली तरी त्यांनी याबाबत इन्कार केला आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा उमेदवार या जाहीर मेळाव्यात घोषित केला जाईल, असे बोलले जात आहे. त्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व आमदार राजन साळवी यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसची लोकसभा निवडणुकीत कोंडी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येईल, असे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. सिंधुदुर्ग अर्थातच कोकणने शिवसेनाप्रमुखांवर प्रेम केले. त्याची परतफेड अनेकांना शेंदूर फासून शिवसेनाप्रमुखांनी केली. शिवसेनाप्रमुखांमुळे आर्थिक व राजकीय क्षेत्रात अनेकजण गब्बर झाले. त्या कोकणात सध्या शिवसेना उभारी घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असे सांगण्यात आले. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सभा गर्दी खेचणारी ठरेल, अशी तयारी शिवसेना करीत आहे. शिवसेनेला आव्हान देऊन बाहेर पडलेल्या काँग्रेस नेते तथा पालकमंत्री नारायण राणे यांच्या कुडाळ मतदारसंघात ही सभा होणार आहे.