मराठवाडय़ात दिवसेंदिवस दुष्काळ भीषण रूप धारण करीत आहे. येत्या काही दिवसांत पाण्याचे टँकर वाढतील, असा अंदाज आहे. परंतु या वेळी सर्वाधिक चिंता आहे ती घसरलेल्या उत्पादकतेची. कापसाच्या तीन वेचण्या अपेक्षित होत्या, तेथे एक तरी वेचणी होईल का आणि गुंतवलेली रक्कम पदरात पडेल का, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. दुष्काळात शेतकरी होरपळला जात असल्याने त्याच्या मदतीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा, या साठी विरोधी पक्षही सरसावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ६३ आमदारांसह मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर येणार आहेत. सोमवारपासून (दि. २४) नांदेड येथून सुरू होणाऱ्या दौऱ्यात परभणी व जालना येथे ते भेट  देणार आहेत.
नांदेडमध्ये विष्णुपुरी धरणाला भेट दिल्यानंतर ठाकरे कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या सुदाम माधव मोरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. लोहा येथील प्रताप पाटील चिखलीकरांच्या कार्यालयातही ते जाणार आहेत. जालन्यातील वखारी येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी विजय पवार यांच्या कुटुंबीयांना ते भेटणार आहेत. मराठवाडय़ात ८ हजारांहून अधिक गावांची पैसेवारी ५०पेक्षा कमी आल्याने शेतकरी हैराण आहेत. उत्पादकता घटल्याने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी नुकताच मराठवाडय़ाचा दौरा केल्यानंतर उद्धव ठाकरे मराठवाडय़ात येत आहेत.
औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्य़ांत टँकरची संख्या वाढू लागली आहे. औरंगाबाद व जालन्यात प्रत्येकी १२, तर बीडमध्ये ६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. हिवाळ्यातच पाणीपुरवठय़ासाठी खासगी विहिरींचे अधिग्रहण करावे लागत आहे. आतापर्यंत २१८ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्याचा अहवाल सरकारनेही मान्य केला आहे. २११ प्रकरणांमध्ये १ लाख रुपये मदतीचे वाटप करण्यात आले.