बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यांच्या पाठीत खंजीर तुम्ही खुपसणारे तुम्हीच आहात. जामिनावर सुटून आलात पण जमिनीवर येता आले नाही अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या टीकेला उत्तर दिलं. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या आणि सामान्यांच्या भेटी घेऊन ते त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. याच दरम्यान झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात छगन भुजबळ यांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत मात्र शिवसेनेचा देव बाळासाहेब आहे, असा खोचक टोला छगन भुजबळांनी लगावला होता. तसेच महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभारण्याकडे लक्ष द्यावे असेही भुजबळ यांनी म्हटलं होतं याच टीकेला उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. याचवेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. मोदी यांच्याशी संवाद साधणाऱ्या नागरिकांना अधिकारी खोटं बोलण्याचं ट्रेनिंग देतात असा आरोप यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.

तसंच राज्यात दुष्काळ पडलाय. ठिकठिकाणी धरणं कोरडी पडलीत. अजित पवारांना धरणाजवळ फिरकू देऊ नका, धरणे सोडा, घरातील पिंप भरा अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर केली. राज्य सरकारने ३६ हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा केली. पण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झालाच नाही. मग एवढा आकडा आला कुठून ? असा सवाल उपस्थितीत कर याचा शोध घेणार असं उद्धव ठाकरे म्हणाले.