खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालण्यास सांगितले आहे. त्यांची मुजोरी सहन केली जाणार नसल्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे.
प्रत्येकवेळी छत्रपतींच्या घराण्यावर गरळ ओकून ते राजकारण राजकारण करत असल्याचे छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटले आहे. तसेच, त्यांनी अगोदर माहिती घ्यायला पाहिजे होती की, मॉ जिजाऊ जयंती, सिंदखेडराजा येथे मी काय बोललो आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
उद्धवजी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती, सिंदखेड राजा मध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही.@OfficeofUT @AUThackeray @ShivSena
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 12, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरून भाजपावर टीकेची झोड उठवली जात आहे. सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे भोसले आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना सवाल केला आहे. “शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली, हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का?,” असा प्रश्न राऊत उपस्थित यांनी केला होता.
काय म्हणाले संजय राऊत –
“जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते. महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे, श्रीमंत शिवेंद्रराजे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांच्या वंशजांनो बोला… काहीतरी बोला…,” असं संजय राऊत म्हणाले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 12, 2020 10:10 pm