News Flash

लिंग परिवर्तन केलेल्या विद्यार्थ्यांचा स्वतंत्र दर्जा ठेवण्याचे यूजीसीचे निर्देश

शालेय पातळीवर स्त्रीलिंगी, पुरुषलिंगी व नपुंसकलिंगी, असे लिंगभेद शिकविले जातात

 

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाचा सकारात्मक प्रतिसाद 

लिंग परिवर्तनानंतर संभ्रमावस्थेत वावरणाऱ्या व समाजमान्यतेसाठी चाचपडणाऱ्या व्यक्तींसाठी शैक्षणिक पातळीवर एक आनंदवार्ता आहे. स्त्री व पुरुषांसह अशा व्यक्तींसाठी आता स्वतंत्र दर्जा ठेवण्याचे निर्देश यूजीसीने दिले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचीही सूचना आहे.

शालेय पातळीवर स्त्रीलिंगी, पुरुषलिंगी व नपुंसकलिंगी, असे लिंगभेद शिकविले जातात. बदलत्या जनुकीय वातावरणात पुरुषांमध्ये स्त्रीतत्व किंवा स्त्रीमध्ये पुरुषतत्व अधिक प्रमाणात आढळून आल्यास शस्त्रक्रियेद्वारे लिंगबदल करून देहाची पूर्ण ओळख निर्माण करण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, अशा व्यक्ती तृतीयपंथी नव्हेत. बदलानंतर ती पूर्णत: स्त्री किंवा तो पूर्णत: पुरुष म्हणून ओळखला जावा, अशी लिंगबदल करवून घेणाऱ्यांची शरीरगत अपेक्षा असते. त्यांना स्वतंत्र दर्जा मिळावा का, या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने होकारात्मक दिले आहे. त्यास केंद्र शासनानेही पाठिंबा दिला आहे. त्याची अंमलबजावणी आता उच्च शैक्षणिक क्षेत्रात प्रथमच होऊ घातली आहे. युजीसीचे सचिव डॉ.जसपाल संधू यांनी या विषयीचे निर्देश देशभरातील विद्यापीठांना दिले आहेत. महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थी व विद्यार्थिनींना दिल्या जाणाऱ्या लिंगनिहाय सोयीसुविधेत आता तिसरा रकाना असा लिंगपरिवर्तित व्यक्तींचा असावा. समान न्यायाचे तत्व लागू करण्याचा यामागे उद्देश आहे. विविध स्पर्धा किंवा उपक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रतिनिधीसोबतच लिंगपरिवर्तित (ट्रान्सजेंडर) व्यक्तींचे स्वतंत्र प्रतिनिधित्व असावे, असे याद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत एक अन्य बाब उपस्थित केली जाते. लिंगनिहाय गणना करतांना मुलीचे मुलात किंवा मुलाचे मुलीत परिवर्तन झाल्यास वर्गबदल करावा की, ही वर्गवारीच वेगळी ठेवावी लागणार, याविषयी संभ्रम आहे. लिंगपरिवर्तनाच्या घटनांमध्ये बदल घडून आलेल्या व्यक्ती सहसा ओळख देण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे विद्यापीठ किंवा महाविद्यालयीन पातळीवर या निर्देशाची अंमलबजावणी तारेवरची कसरत ठरू शकते, असाही सूर आहे.

स्वतंत्र ओळख जपण्याचा प्रयत्न -डॉ. येवले

यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्र.गो.येवले म्हणाले की, लिंगनिहाय वर्गीकरणात हा तिसरा प्रकार समाविष्ट करण्यामागे अशा व्यक्तींनी स्वतंत्र ओळख जपण्याचा प्रयत्न असू शकतो. मुलींसाठी ज्याप्रमाणे प्रवेशात ३० टक्के आरक्षण असते, तसा फोयदा मिळेल का, याबाबत मात्र संदिग्धता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 2:41 am

Web Title: ugca gave order to independent status for gender changes student
Next Stories
1 विद्यापीठ कायद्याबाबत शासनाची दुटप्पी भूमिका
2 ५०० अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव
3 राज्यात ५ हजार शाळांमध्ये स्पोकन इंग्लिशचा प्रयोग
Just Now!
X