उजनी धरणातील पाणी माणसं आणि जनावरांच्या पिण्यायोग्य नसल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर विद्यापीठाने केलेल्या संशोधनात ही खळबळजनक माहिती समोर आली आहे.  उजनी धरणातील पाण्याचा सोलापूर विद्यापीठानं शास्त्रशुध्द अभ्यास केला असून या चाचणीत पारा, शिस आणि अनेक रासायनिक घटक आढळून आले आहेत. त्यामुळे या धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

उजनी धरणातून सोलापूरसह, उस्मानाबाद, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांना पाणीपुरवठा केला जातो. सोलापूर, उस्मानाबाद, पंढरपूर, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, कुर्डुवाडी, करमाळा आणि उस्मानाबाद या शहरांसह ४०० हून अधिक गावांना या धरणातून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र हे पाणी माणसं आणि जनावरांनाही पिण्यायोग्य नाही, असा निष्कर्ष निघाल्याने पिण्याच्या पाण्याचा तसेच या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.