जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी युद्ध करावे, असे मत व्यक्त होत असतानाच कायदेतज्ज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युद्ध करणे सोपे नाही, असे परखड मत मांडले आहे. युद्धाची खुमखुमी, विचार देशाच्या प्रगतीला घातक असतात, असे त्यांनी म्हटले आहे.

लातूरमध्ये उज्ज्वल निकम यांच्या हस्ते आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘आदर्श नवरत्न’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी निकम यांनी पाकिस्तानसोबत युद्ध करणे योग्य की अयोग्य यासंदर्भात भूमिका मांडली. युद्धाची खुमखुमी, विचार देशाच्या प्रगतीला घातक असतात. युद्ध करणे सोपे नाही, असे त्यांनी सांगितले.

भाषणादरम्यान निकम यांनी आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या कामाचेही कौतुक केले. जगात प्रामाणिक माणसे आहेत, पण अनेकदा प्रामाणिकपणाचा अहंकार असतो. मनात अहंकार असल्यास पाय जमिनीवर राहात नाहीत. आदर्श मैत्री फाऊंडेशनने समाजातील चांगली आणि गुणवान माणसे शोधून त्यांना पुरस्काराने गौरवण्याचे मोठे काम केले आहे, असे निकम यांनी नमूद केले.