उल्हासनगरमध्ये महेक ही पाच मजली इमारत कोसळल्याची घटना आज (मंगळवारी) सकाळी घडली. दरम्यान, सोमवारी ही इमारत एका बाजूला झुकल्याचे काही रहिवाशांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती अग्निशमन दलाला दिली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत इमारतीतील 31 कुटुंबांना बाहेर काढत इमारत सील केली होती. त्यानंतर आज सकाळी 10 च्या सुमारास ही इमारत कोसळली.

उल्हासनगर कॅम्प नंबर 2 मध्ये असेलेल्या महेक या इमारतीच्या घरांचे दरवाजे उघडत नसल्याने इमारतीतील रहिवाशांनी घटनेची माहिती सोमवारी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांन घरांचे दरवाजे उघडून सर्वांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, अग्निशमन दलाने इमारतीची पाहणी केली असता इमारतीचा खांब खचल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर वास्तुविशारद भूषण कटारिया यांनी या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर याबाबत संपूर्ण माहिती उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त गणेश शिंपी यांना देण्यात आली. आयुक्त शिंपी यांनी रहिवाशांना आपल्या घरातील मौल्यवान वस्तू आणण्यासाठी काही वेळ दिली होती. त्यानंतर महानगरपालिकेने ही इमारत सील केली होती.

दरम्यान, मंगळवारी सकाळी ही इमारत कोसळली. या घटनेत रहिवाशांना आधीच बाहेर काढले असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.