आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी बारावीच्या परीक्षेतील पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला असतानाच आता दहावीच्या परीक्षेबाबतही तीच अडचण उद्भवली आहे. शाळांसाठीचे मूल्यांकनाचे निकष जाचक असल्याचा आरोप करत विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी दहावीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनावर बहिष्कार टाकला आहे.
महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या सदस्यांनी दहावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला. विनाअनुदानित शाळांसाठीचे मूल्यांकनाचे निकष जाचक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. विनाअनुदानित शाळांमध्ये कायम झालेल्या शिक्षकांना शासनाने सेवेत सामावून घ्यावे, अशा काही मागण्यांसाठी या शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले, ‘‘आम्हाला शासनाने अनेक वेळा आश्वासन दिले, पण आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. ३१ डिसेंबर २०१२ पूर्वी याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र ते पूर्ण झाले नाही, म्हणून आंदोलन करण्यात येत आहे. राज्यात साडेचार हजार विनाअनुदानित शाळा आहेत. आंदोलनाचा भाग म्हणून या सर्व शाळा मंगळवारी (१२ मार्च) व बुधवारी (१३ मार्च) बंद ठेवण्यात येणार आहेत.’’
तपासणीला फटका नाही
विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी दहावीच्या पेपर तपासणीवर टाकलेल्या बहिष्काराचा फारसा परिणाम जाणवणार नाही, असा दावा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केला आहे. मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सांगितले की, ‘‘विनाअनुदानित शाळांची संख्या खूप नाही. या शिक्षकांच्या बहिष्काराचा उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर परिणाम होईल, तरीही दहावीचा निकाल व्यवस्थित आणि वेळेवर लावण्याचा प्रयत्न केला जाईल. शिक्षकांच्या मागण्यांवर आणि बहिष्कारावर लवकरच तोडगा निघेल अशी आशा आहे.’’