व्यावसायिक अविनाश कोठारी अनधिकृत बंगल्यावर हातोडा

मुंबई उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर अलिबाग परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईला वेग आला आहे. शहाजादी कुंदनमल यांच्या कोळगाव येथील अनधिकृत बांधकामांविरोधात गेल्या आठवडय़ात कारवाई करण्यात आली होती. यापाठोपाठ कोळगाव येथीलच व्यावसायिक अविनाश कोठारी यांच्या अनधिकृत बांधकामांवर जिल्हा प्रशासनाने बुलडोझर चालवला. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अलिबागमधील अनधिकृत बांधकामांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात २००९ साली एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान २००८-२००९ ला उच्च न्यायालयाने प्रचलित नियमांनुसार कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यात अविनाश कोठारी यांच्या कोळगाव येथील १५०० चौरस मीटर अनधिकृत बांधकामांचा समावेश होता. या निर्णयाविरोधात कोठारी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

यावर अलिबागच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची फेरचौकशी करून निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. तेव्हापासून कुंदनमल यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई प्रलंबित होती.

यानुसार ८ ऑगस्ट २०१८ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी कोठारी यांनी कोळगाव हद्दीत सव्‍‌र्हे नंबर ३०७ मध्ये १ हजार ५०० चौरस मीटर अनधिकृत बांधकाम केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज या अनधिकृत बांधकामावर आज जिल्हा प्रशासनाने कारवाई केली. यावेळी प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, उपकार्यकरी अभियंता मधुकर चव्हाण तसेच महसूल, पोलीस, विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

सात दिवसांपूर्वी सदरचे बांधकाम पाडण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानुसार आज सकाळी ११ वाजल्यापासून महसूल, सार्वजनिक विभागाकडून बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. जेसीबी व मजूर लावून बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे.

२३ सप्टेंबर रोजी शहाजिदा कुंदनमल यांच्या धोकवडे येथील अनधिकृत बंगल्यावर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र हे प्रकरण पुन्हा न्यायालयात गेल्याने कारवाई थांबविण्यात आली होती.