कारवाईनंतरही सीआरझेड क्षेत्रात अनधिकृत बांधकामे सुरूच
जिल्हा प्रशासनाच्या कारवाईनंतरही सीआरझेड क्षेत्रात अनधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरू आहेत. किहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर समुद्रात भराव टाकून बांधकामे केली जात आहेत.
रायगड जिल्ह्य़ातील समुद्रकिनारी सी.आर.झेड. कायद्याचे उल्लंघन करण्यात आलेल्या बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. पर्यावरणमंत्र्यांच्या आदेशानंतर अलिबाग आणि मुरुड समुद्रकिनाऱ्यावर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या १५७ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर नवीन अनधिकृत बांधकाम थांबतील अशी अपेक्षा होती. वर्षभरात एकाही अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले नसल्याने आता या कारवाईतील फोलपणा उघड झाला आहे. त्यामुळे आता समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांना सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. किहीम समुद्रकिनाऱ्यावर कामत परिसरात तीन बंगल्याभोवती किनाऱ्यावर भराव टाकून बांधकामे केली जात आहेत. रायगड जिल्ह्य़ातील समुद्रकिनारी बडे उद्योगपती, व्यावसायिक, सी. आर. झेड. कायद्याचे उल्लंघन करून आलिशान बंगले बांधले आहेत. मुरुड समुद्रकिनारी १४५, तर अलिबाग समुद्रकिनारी १४१ बांधकामे करण्यात आली आहेत. या बांधकामांवर कारवाई करण्याचे पर्यावरणमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत १५७ बांधकामांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात अलिबाग तालुक्यातील ७० आणि मुरुड तालुक्यातील ८७ बांधकामांचा समावेश आहे. ही सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट झाल्याचे कारण पुढे करत आता कारवाई थंडावली आहे.
जिल्हा प्रशासनाची कारवाई थंडावल्याचा फायदा उचलण्यास बंगले मालाकांनी सुरुवात केली आहे. त्यातून पुन्हा एकदा समुद्रकिनारी बांधकामे करण्यास सुरुवात झाली आहे. किहीम हद्दीतील कामत येथे समुद्रकिनारी असलेल्या समुद्राच्या वाळूत वॉल पिचिंगची बांधकाम कामे केली जात आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे समुद्रकिनाऱ्यांवर अशी बांधकामे सुरू असल्याचा अहवाल तलाठी कार्यालयाकडून तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे, मात्र तरीही या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
दरम्यान, तलाठी कार्यालयामार्फत कामत येथे समुद्रकिनारी बांधकामे सुरू असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार सदर बांधकामांना नोटीस बजावली आहे. नोटिशीची मुदत संपल्यावर या सर्वावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अलिबागचे तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी स्पष्ट केले.