|| हर्षद कशाळकर

हॉटेलांमधील अनैतिक प्रकारांबाबत चिंता

तीन महिन्यांत घडलेल्या दोन घटनांनी अलिबाग या पर्यटन स्थळाचे प्रतिमाभंजन झाले आहे. पंचतारांकित हॉटेल्ससह इतर नामांकित हॉटेल्समध्ये चालवल्या जाणाऱ्या गैरप्रकारांचा पोलिसांनी बुरखाच फाडला आहे. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमधून आणलेल्या देशी-विदेशी मुलींच्या मदतीने हॉटेलचालकांनी अनैतिक धंदा सुरू केला होता.

निळाशार समुद्र, नारळी-फोफळीच्या बागा, कुलाबा, खंदेरी, उंदेरी यांसारख्या जलदुर्गाचा ऐतिहासिक ठेवा यामुळे अलिबाग परिसर हा मिनी गोवा म्हणून ओळखला जातो. दर वर्षी जवळपास २० लाख पर्यटक या परिसराला भेट देत असतात. राज्यात इतर कुठल्याही परिसराच्या तुलनेत ही संख्या किती तरी पटीने अधिक आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे यांसारख्या शहरांजवळून दळणवळणाची उत्तम सोय असल्याने अलिबाग पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. मात्र आता पर्यटनाबरोबरच या परिसरात अनैतिक व्यवसाय वाढल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच अलिबागमधील रेडिसन ब्लू या पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकली होती. आणि इंटरनेटच्या माध्यमातून परदेशी मुली आणून चालविला जाणाऱ्या देहविक्रय पोलिसांनी उघड केला होता. यात पाच विदेशी मुलींची सुटका करण्यात आली होती. त्यापाठोपाठ शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी शहरातील तीन नामांकित हॉटेल्सवर धाडी टाकल्या, यात मीरा माधव, रविकिरण आणि विठ्ठल रुक्मिणी कॉटेजवर धाडी टाकल्या, आणि पुण्याहून आणण्यात आलेल्या १८ मुलींची सुटका केली. या प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली. या दोन घटनांमुळे शहरात वाढत्या पर्यटनाबरोबर फोफावत असलेले अनैतिक प्रकार पुढे आले आहेत.

याखेरीज नुकतेच महाविद्यालयीन तरुणांना गांजा विकणाऱ्या एका टोळीचा छडा पोलिसांनी लावला होता. शहरातील विविध भागांत छापे टाकून पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात गांजा हस्तगत केला होता. या दोन्ही घटनांची सांगड घातली तर चंगळवादी संस्कृतीचे आक्रमण येथील समाजव्यवस्थेवर होण्यास सुरुवात झाली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये याबाबत असुरक्षितता निर्माण होणे स्वाभाविक आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे या घटनांना काही काळ आळा बसेलही, पण चंगळवादी संस्कृतीचे आक्रमण आणि शहरात पसरणारा अनैतिक धंद्याचा विस्तार रोखायचा असेल तर सामुदायिक प्रयत्न गरजेचे आहेत.

अनैतिक धंद्याविरोधात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या वतीने व्यापक कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्य़ात याअंतर्गत गेल्या तीन महिन्यांत व्यापक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सुरू राहील.  जे. ए. शेख, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, रायगड

मुंबईची चंगळवादी संस्कृती आता रायगड जिल्ह्य़ात सरकायला लागली आहे. यातूनच असे प्रकार घडत आहेत. असे अनैतिक प्रकार रोखणे ही केवळ पोलिसांची जबाबदारी नाही, तर समाजातील विविध घटकांनी या प्रकाराविरोधात एकत्रित येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे. अन्यथा याचे सर्वात जास्त परिणाम तरुण पिढीवर होताना दिसतील.    डॉ. सचिन पाटील, अध्यक्ष, रिसोर्स सेंटर फॉर ह्य़ुमन डेव्हलमेंट