नाशिक डायोसेशन कौन्सिल (पीटीआरडी-२) संस्थेचे अनधिकृत विश्वस्त प्रशासनाची दिशाभूल करून व आर्थिक गैरव्यवहार करून, नगर शहरातील सेंट मोनिका डी.एड. कॉलेजच्या जागेचे अनधिकृत प्लॉट पाडून भाडेपट्टा तयार करत आहेत. या बेकायदा व्यवहारात नोंदणी उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही सहभागी आहेत. त्याची चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांना प्रशांत पगारे व इतरांनी हे निवेदन दिले. निवेदनात बेकायदा व्यवहार करणाऱ्या दोघा अनधिकृत विश्वस्तांची नावेही देण्यात आली आहेत. याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशाराही पगारे यांच्यासह केनेथ काळसेकर, सिसील भक्त, राजू देठे, सतीश जाधव, रवींद्र ठोंबरे आदींनी दिला आहे.
निवेदनात म्हटले, की नाशिक डायोसेशन कौन्सिल ही धार्मिक संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत आहे. संस्थेचे नगरसह नाशिक व मनमाड येथे मोठे भूखंड आहेत. संस्थेच्या विश्वस्तांची मुदत सन २००१ मध्येच संपली आहे. मात्र शेडय़ूलवर नोंद असल्याचा गैरफायदा घेऊन दोघे अनधिकृत विश्वस्त नगर शहरातील सेंट मोनिका डी.एड. कॉलेजच्या जागेवर प्लॉट पाडून, त्याचे उपनिबंधक कार्यालयाकडून बेकायदा भाडेपट्टा करून घेत आहेत. नाशिकच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागेची कोणतीही विक्री, बांधकाम अथवा भाडेपट्टा करण्यास मनाई आदेश दिलेला आहे.
या आदेशाची प्रतही आम्ही उपनिबंधक कार्यालयाला दिली आहे. तरीही मोठा आर्थिक गैरव्यवहार करून भाडेपट्टा करून दिला जात आहे. भाडेपट्टा करताना उपनिबंधक कार्यालय कागदपत्रांची योग्य शहानिशाही करत नाहीत, अनधिकृत विश्वस्तही प्रशासनाची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे अनधिकृत विश्वस्तांसह अधिकारी व कर्मचा-यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.