बीड जिल्हा रुग्णालयात स्ट्रेचर नसल्याने महिलेला झोळी करुन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे. स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने एका रुग्णाला झोळी करुन रुग्णालयात दाखल करावं लागल्याचं समोर आलं आहे. रुग्णालयातील भोंगळ कारभाराविरोधात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राज्याच्या आरोग्य खात्यावर आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.  “महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याला कोणी वाली आहे का”? असा संतप्त प्रश्न मुंडे यांनी विचारला आहे.

गेल्या महिन्यात एका महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करतेवेळी स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने पांघरायची चादर झोळी म्हणून वापरण्याची वेळ नातेवाईकांवर आली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेला महिनाही उलटला नाही तोच असाच एक प्रकार पुन्हा समोर आला आहे. स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने एका रुग्णाला झोळी करुन रुग्णालयात दाखल करतानाचा व्हिडीओ ट्विट करुन धनंजय मुंडे यांनी “महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याला कोणी वाली आहे का”? असा सवाल केला आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याचं वारंवार समोर येत आहे. अनेकदा मागणी करुनही रुग्णालयात लिफ्टची सोय करण्यात आलेली नाही. तसेच स्ट्रेचरची सुध्दा उपलब्धता नाही. त्यामुळे रुग्णांना वर-खाली नेताना रुग्णाच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागत आहे. आज पुन्हा एकदा रुग्णालयातील भोंगळ समोर आला.