ढगांच्या गडगडाटासह पहाटे पाऊस कोसळला. लोक साखरझोपेत असताना सतत दोन रात्री अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे वीज गायब झाली. आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. सतत दोन दिवस भल्या पहाटे पाऊस कोसळत असून वीजही गायब होत आहे. आज तब्बल एक तास वीज गायब झाली होती. त्याशिवाय काही भागात विजेचा लपंडावदेखील सुरूच होता.या अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग आर्थिक नुकसानीत सापडला आहे. आंबा व काजू बागायतदारांचे त्यामुळे नुकसान होणार आहे. उशिराने आंबा बागायतींना फळे धरली, ती फळे अद्यापि परिपक्व झाली नसल्याने त्या बागायतदारांना अवेळी पावसाच्या दणक्याने आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पण बाजारपेठेत आंबा मात्र स्वस्त झालेला नाही. अजूनही सर्वसामान्यांना आंब्याची गोडी चाखायला मिळण्याची शक्यता कमीच आहे. बागायतदारांना खाली कोसळलेले आंबे कॅनिंगला देण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात आले.या पावसाचा फटका सध्या करण्यात येणाऱ्या डांबरीकरणाला बसण्याची भीती व्यक्त होत आहे. खरे तर १५ मेनंतर डांबरीकरण केले जात आहे. पण सध्या डांबरीकरण करण्याच्या कामांचा धडाका लागला आहे. अवेळी पाऊस सुरू झाल्याने त्याला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.