19 September 2020

News Flash

ऊसतोड रोखल्यामुळे साखर उद्योगात अस्वस्थता

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडे ओढून घेण्याची रस्सीखेच शेतकरी संघटनांमध्ये सुरु आहे.

(संग्रहित छायाचित्र)

संघटनांच्या ऊ सदर मागणीचा परिणाम

दयानंद लिपारे, कोल्हापूर

नवरात्रीमध्ये बॉयलर पेटवून ऊ स गळीत हंगाम सुरु केला असताना शेतकरी संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे व ऊसतोड रोखण्याच्या प्रकारांमुळे साखर कारखानदारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. हंगामाची नांदी होत असतानाच उसाला अधिक भाव मिळाला पाहिजे अशी भूमिका घेत संघटनांच्या परिषदा सुरू झाल्या असतानाच ऊसदर आंदोलनही सुरु झाल्याने साखर उद्योगात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

यावर्षीच्या ऊ स गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. उसाची उपलब्धता कमी होण्याच्या शक्यतेने काही साखर कारखानदारांनी ऊ स आणायला सुरुवात केली आहे.  तर बऱ्याच कारखान्यांनी ऊस दराची निश्चिती झाल्यानंतर गाळप सुरु करण्याचे ठरवले आहे. ज्या कारखान्यांनी ऊ स तोडणी सुरु केली आहे त्यांना शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. कोल्हापूर, सांगली आणि सीमाभागात उसाची वाहतूक रोखण्याचे प्रकार सुरु आहेत. ऊस दराची घोषणा करा, मगच ऊस कारखान्यांना न्या, अशी आक्रमक भूमिका घेतली जात आहे. यामुळे हंगाम सुरु करणाऱ्या साखर कारखानदारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

शेतकरी संघटनांचे दरयुद्ध

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडे ओढून घेण्याची रस्सीखेच शेतकरी संघटनांमध्ये सुरु आहे. याद्वारे राजकीय स्थान बळकट करण्याचा प्रयत्न  शेतकरी नेत्यांचा आहे. त्यातून एकापेक्षा अधिक दर मागण्याची चढाओढ लागली आहे. आणि त्याचे केंद्र कोल्हापूर बनले आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी उसाला प्रतिटन ३५०० रुपये भाव मिळावा अशी मागणी केली. तर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक , कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शेतकरी परिषदेत एफआरपी अधिक २०० रुपये मिळावेत अशी मागणी केली. शिवसेनेच्या पहिल्याच ऊ स परिषदेत कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी मागणी वाढवत उसाची पहिली उचल ३६०० रुपये देण्याची मागणी केली. आता शेतकऱ्यांचे आणि साखर कारखानदारांचेही लक्ष लागले आहे. ते उद्या शनिवारी होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या परिषदेत खासदार राजू शेट्टी कोणता दर मागतात याकडे  शेट्टी यांची मागणी आणि भूमिका कलाटणी देणारी असते. पण त्याला खो देण्याची भूमिका सदाभाऊ  खोत यांनी घेतली असल्याने शेतकरी संघटनांच्या नेत्यांमधील वर्चस्वाच्या लढय़ाबरोबर उसाचे दरयुद्ध भडकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम गाळप हंगामावर होणार असल्याने त्याची भीती साखर उद्योगात जाणवत आहे.

कारखानदारांची भूमिका निर्णायक

शेतकरी संघटनांमध्ये उसाला दर मागण्याची शर्यत लागली असली तरी त्यांना अपेक्षित असणारा भाव साखर कारखानदार देणार का, हा कळीचा मुद्दा आहे. साखरेचे स्थिर दर , अपेक्षित उठाव नसणे, गत  हंगामातील कर्ज—देय रकमांचा  बोजा, बँकांनी वित्तसाहाय्य करण्यासाठी आखडता घेतलेला हात याचा परिणाम म्हणून साखर कारखानदार एफआरपी इतकी तरी रक्कम देण्याबाबत साशंक असल्याचे दिसतात. हप्त्य़ाने रक्कम देण्याचा विचार त्यांच्यामध्ये दिसत आहे. पण, शेतकरी संघटनांची आक्रमक भूमिका आणि तोंडावर आलेली निवडणूक यामुळे शेतकऱ्यांना नाराज करणेही त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे नेमकी कोणती भूमिका घ्यावी याबाबत त्यांच्यात संभ्रम आहे. ऊ सतोडणी करणाऱ्या टोळ्या आधीच कमी आल्या आहेत. ऊ सतोड रोखली जात असल्याने त्या अन्य भागात , कर्नाटकात जाण्याची शक्यता आहे. यामुळे ही कोंडी लवकर फुटणे सर्वाच्याच हिताचे आहे, असे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे संस्थापक, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 3:18 am

Web Title: uncertainty in sugar industry due to blocking the sugarcane
Next Stories
1 अजित पवारांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर कोल्हापूर राष्ट्रवादीत गटबाजीचे दर्शन
2 तरुण संशोधकांच्या उत्साहाला लालफितीचा अडसर – भागवत
3 कोल्हापुरात यंदाच्या दिवाळीत राजकीय फटाके!
Just Now!
X