वसई-विरारमध्ये विनापरवाना कंपन्यांचा पुन्हा सुळसुळाट

वसई : वसई-विरारमध्ये पुन्हा एकदा बाटलीबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. बाटलीबंद पाणी विकणाऱ्या अनेक कंपन्या  शहरात कार्यरत आहेत. कोणतीही प्रक्रिया न करता त्या पाण्याची विक्री केली जात आहे. नागरिकांना या दूषित पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड तर सहन करावा लागतो आहेच, पण त्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.

शहरात बाटलीबंद पाण्याची विक्री करणारा धंदा पुन्हा एकदा जोरात सुरू आहे. अनेक बनावट कंपन्या दूषित  आणि प्रक्रिया न केलेले पाणी बाटलीबंद शुद्ध पाणी म्हणून विकले जात आहे. वसई विरारच्या छोटय़ा टपऱ्या तसेच मोठय़ा उपाहारगृहांत बाटलीबंद दूषित पाण्याची विक्री केली जात आहे.

यातील बहुतेक कंपन्या या अनधिकृत आहेत. नागरिक शुद्ध पाण्यासाठी पैसे मोजत आहेत. परंतु प्रत्यक्ष बंद बाटलीतील पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बाटलीबंद पाणी विकणाऱ्या कंपन्यांच्या व्यवहारावर कोणाचेही नियंत्रण नाही. या पाण्याचा सर्रास वापर शुद्ध पाणी म्हणून केला जात आहे. हे पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मागील वर्षी अन्न व औषध प्रशासनाने वसई विरारमध्ये केवळ  ३० ते ४०  पाणी प्रकल्पांना परवाने देण्यात आल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात शेकडो कंपन्या सुरू असल्याची बाब उघड झाली आहे. बाटलीबंद पाणी हे कूपनलिका, बावखले आणि विहिरीतून घेतले जाते.  काही पाणीविक्रेते पालिकेच्या जलवाहिन्या फोडून ते बाटलीत भरत असल्याच्या तक्रारी अनेकदा करण्यात आल्या आहेत.

पालिकेचे पाणी नाही

शहरात मोठय़ा प्रमाणावर बांधकामे होत असून नवनवीन वसाहती, चाळी तयार होत आहेत. या वसाहतींना पालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे अशा वसाहतींमधील रहिवाशांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. अर्थात टँकरचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने अनेक नागरिक बाटलीबंद पाणी विकत घेतात.  २० लिटरच्या बाटल्यांमधील  पाणी नागरिक शुद्ध पाणी म्हणून घरी आणतात. टँकर पाण्याला तसेच पिण्यासाठी अशा बाटलीबंद पाण्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागत आहेत. त्याचा आर्थिक भुर्दंड त्यांना सहन करावा लागतो, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते राज दसोनी यांनी केला.

अनेक ठिकाणी पुन्हा एकदा बेकायदेशीर बाटलीबंद पाणी विकण्याचे प्रकार सुरू झाले आहे. अशा कंपन्यांवर आम्ही कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी तीन कंपन्यांना टाळे ठोकण्यात आले आहे.

– सुखदेव दरवेशी, आरोग्य निरीक्षक, प्रभाग समिती ‘जी’

आमच्या हद्दीत एकूण २९ बेकायदा बाटलीबंद पाण्याचे प्रकल्प आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी यापूर्वीच पोलिसांना पत्र देण्यात आले होते. मात्र कारवाई न झाल्याने त्यांना आता टाळे ठोकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

-सुरेंद्र पाटील, प्रभारी साहाय्यक आयुक्त