विधानसभा निवडणुकीपूर्वी समांतर जलवाहिनीचा नारळ फोडतानाच भूमिगत मलनिस्सारण योजनाही वेगाने सुरू केली जाईल, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी रविवारी सांगितले. या योजनेबरोबरच येत्या काही दिवसात शहरातील रस्त्यांसाठी ६२३ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून आणणे, ही प्राथमिकता असेल. तसेच येत्या दोन-तीन महिन्यात आयआयएमसह अन्यही विकासाचे प्रकल्प मार्गी लागतील, असेही ते म्हणाले.
 भुयारी मलनिस्सारण योजनेत २६० किलोमीटर नवीन वाहिनी टाकली जाणार असून सहा शुद्धीकरण केंद्र उभारले जाणार आहेत. वाहिनीसाठी २३४ कोटी, तर ६ केंद्रांसाठी १२५ कोटी रुपये खर्च होतील, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. ३४.९९ टक्के अधिक दराने या योजनेची निविदा मंजूर करण्यात आली असून शहरातील कुठल्या भागात शुद्धीकरण केंद्र होतील, याच्या जागा ठरविल्या जात आहेत. कंत्राटदार कंपनीने ४८ व्यक्तींची नेमणूक केली असून ही योजना लवकरच पूर्ण केली जाईल, असे सांगण्यात आले. समांतर जलवाहिनी आणि भूमिगत मलनिस्सारण योजनेचे श्रेय निवडणुकीपूर्वी पदरात पडावे, यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत खासदार खैरे यांनी या योजना मंजूर करून आणण्यासाठी कसे अट्टाहासाने प्रयत्न केले, याची माहिती पुन्हा एकदा दिली. महापालिकेचे अभियंता अफसर सिद्दीकी यांनी या योजनेची माहिती देताना नवीन बदल कसे असतील, हे सांगितले. शुद्धीकरण केंद्र उभारताना काही ठिकाणी जागेची अडचण जाणवत असल्याने प्रस्तावित काही केंद्र अन्य ठिकाणी वळवावे, असेही त्यांनी सुचविले.
एलबीटीच सुरू राहील
जकात की एलबीटी, असा नवाच वाद महापालिकेच्या वर्तुळात होता. एका पदाधिकाऱ्याने एलबीटीऐवजी जकात लागू केली जाईल, असे सांगितले होते. त्या बाबत खासदार खैरे यांनी शहराच्या विकासाला एलबीटीच आवश्यक आहे आणि ती सुरू राहील, असे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.